मनपाच्या नव्या इमारतीची कोनशीला २६ जानेवारीस

0
74

पणजी महापालिकेच्या नव्या सहा मजली इमारतीसाठी पायाभरणी समारंभ येत्या २६ जानेवारी रोजी होणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते प्रकल्पाची कोनशिला बसवण्यात येणार असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल सांगितले.
या प्रकल्पासाठीची फाईल सध्या उत्तर गोवा नगर आणि नियोजन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले. सर्व प्रक्रिया पूर्ततेनंतर फाईल सुडाकडे पाठवण्यात येईल. सुडानंतर बांधकामासाठी निविदा काढील.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महापालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रु. मंजूर केले आहेत. हा १० कोटी रु. चा निधी नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.
येत्या २६ जानेवारीपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो हे प्रयत्नरत आहेत. २६ जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे ते बांधकाम पहिल्या टप्प्यातील इमारतीसाठीचे. इमारतीचे पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील काम अडीच ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.