पुण्यात वराहज्वराचे २७१ रुग्ण सापडले आहेत व १० रुग्णांचे निधन झाले आहे हे खरे असले तरी त्या १० पैकी ६ जणांची अन्य रोगांमुळे प्रकृती खालावलेली होती. त्यामुळेच वराहज्वराच्या लागणीनंतर त्याचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याचे डॉ. बेतोडेकर यांनी स्पष्ट केले.
सध्या वराहज्वराची साथ नसल्याने व वराहज्वराच्या जंतूने आपले रूप व स्वरूप बदललेले नसल्याने मोठा धोका नसल्याचे डॉ. बेतोडेकर म्हणाले.
२००९-१० साली जेव्हा वराहज्वराची साथ पसरली होती, तेव्हा ते जंतू सर्वत्र पसरले होते. त्यामुळे त्या जंतूंशी लढा देण्याएवढी प्रतिकारशक्ती आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे, असे ते म्हणाले. हा जंतू जराही बदलला असता तर मात्र धोका निर्माण झाला असता असे ते म्हणाले. तो बदलला नसल्याने आता या जंतूपासून लोकांना जास्तीत जास्त ताप येऊ शकेल. पण त्यापासून धोका नाही. पण काळजी ही घ्यावीच लागेल, असे ते म्हणाले.
आरोग्य खातेही बारीक लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. सगळी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी ते आतापर्यंत १३ संशयित रुग्णांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्यात एकही वराहज्वराचा रुग्ण आढळला नसल्याचे ते म्हणाले.
गरज असल्यास रुग्णांना वेळीच देता यावी यासाठी औषधे तयार ठेवण्यात आली आहेत. तसेच गोमेकॉ, जिल्हा इस्पितळे व चिखली येथील इस्पितळे तसेच काही खासगी इस्पितळांनाही वेगळ्या खाटींची सोय करण्याची सूचना दिली असल्याचे ते म्हणाले.