Home बातम्या सर्व ४४८ खनिज व्यापार्‍यांचे परवाने तात्पुरते निलंबित

सर्व ४४८ खनिज व्यापार्‍यांचे परवाने तात्पुरते निलंबित

0

पत्त्यांची शहानिशा होणार

खाण खात्याने काल ४४८ खाण व्यापार्‍यांचे परवाने तात्पुरते निलंबित करून त्यांना सर्व दाखले सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. दाखले सादर करू न शकणार्‍यांचे निलंबन मागे घेण्याची शक्यता नाही. पर्रीकर सरकारच्या या भूमिकेमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

खनिज वाहतूक करण्यास नव्या ट्रकांना परवाने न देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. सध्या खनिज वाहतूक करणार्‍या ट्रकांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे सांगे, रिवण, वेळगे, उसगाव, साखळी या खाण परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाणार्‍यांना अपघात होत आहेत. अनेकांचे बळी जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर नव्या ट्रकांना खनिज वाहतूक करण्यास परवाने न देण्याचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

बेकायदा खनिज घोटाळ्याची चौकशी पर्रीकर सरकारने गंभीरपणे सुरू केली आहे. दक्षता खात्यालाही या प्रकरणी कसून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. वरील प्रकरणी वादग्रस्त बनलेले माजी खाण संचालक अरविंद लोलयेकर यांच्या निलंबनाचा आदेश कार्मिक खात्याने परवा रात्री लोलयेकर यांच्या घरी जाऊन दिला. त्यामुळे या खात्यातील अनेक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वरील प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. नवे खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी पदाचा ताबा घेताच वरील कारवाई सुरू केली आहे.