पंजाबविरुद्धच्या ‘ड’ गटातील रणजी सामन्यात गोव्याचा एका डावाने पराभव जवळपास निश्चित झाला आहे. पर्वरी येथील अकादमी मैदानावर हा सामना सुरू आहे. पंजाबच्या पहिल्या डावातील ६३५ धावांना उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव काल २४६ धावांत संपला. पंजाबने फॉलोऑन लादल्यानंतर दुसर्या डावात गोव्याचा संघ २ बाद ६७ असा चाचपडत आहे. गोव्याचा संघ अजून ३२२ धावांनी पिछाडीवर असून संघाच्या पराभवावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. तिसर्या दिवसअखेर गोव्याचा कर्णधार सगुण कामत २६ धावांवर व अमोघ देसाई ३ धावांवर नाबाद आहेत. विनय चौधरीने सुमिरन आमोणकरला वैयक्तिक ५ धावांवर तर सिद्धार्थ कौलने स्वप्निल अस्नोडकरला २६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी, दुसर्या दिवसाच्या १ बाद ९४ धावांवरून काल पुढे खेळताना गोव्याच्या फलंदाजांचा विनय चौधरी व रघू शर्मा या वेगवान-फिरकी दुकलीसमोर निभाव लागला नाही. विनयने तीन व रघूने ४ गडी बाद करत गोव्याचा पहिला डाव २४६ धावांत संपवला. अमित यादवने नाबाद ५२ धावा करत शेवटच्या गड्यासाठी ऋतुराज सिंगसोबत ७० धावांची भागीदारी केली नसली तर द्विशतकी वेसदेखील गोव्याला ओलांडणे शक्य नव्हते.