साळगावकरवर धेंपो भारी

0
72

म्हापसा येथील धुळेर मैदानावर काल गुरुवारी झालेल्या जीएफएफ प्रो लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने साळगावकर फुटबॉल क्लबवर २-० अशी मात केली. ‘गोल्डन ईगल्स’म्हणून ओळखल्या जाणार्‍या धेंपोकडून कपिल होबळे व योगेश कदम यांनी गोल केले.

सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून उभय संघांनी आक्रमक धोरण अवलंबताना प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सामन्यातील पहिली गोलसंधी धेंपो स्पोटर्‌‌स क्लबला प्राप्त झाली. बीवन डिमेलोने साळगावकरच्या बचाफळीला खिंडार पाडत गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला खरा परंतु, गोलरक्षक अभिजित दास याने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. धेंपोच्या आक्रमणातील धार अधिक तीक्ष्ण झाल्याने साळगावकरला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. या दरम्यान धेंपोच्या मारियो मास्कारेन्हसचा फटका गोलरक्षकाने दूर केला तर साळगावकरचा अंडर २० गटातील खेळाडू रिभव सरदेसाई याने दूर अंतरावरून लगावलेला अप्रतिम फटका थोडक्यात दिशाहीन ठरला. ब्रायन मास्कारेन्हस याचा फटकादेखील गोलपोस्टवरून गेला. धेंपोच्या बीवनने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळीची दिसा दाखवली होती. पण, लाईनमनने ‘ऑफसाईड’चा इशारा करत हा गोल नाकारला. मध्यंतर होण्यापूर्वीे धेंपोने आघाडी घेतली. बीवन डिमेलोच्या साहाय्याने कपिल होबळे याने धेंपोला आघाडीवर नेले. मध्यंतरानंतर बीवनचा जोरदार हेडर क्रॉसबारला लागल्याने त्याच्या हाती निराशा आली. काही मिनिटांतच साळगावकरचा गोलरक्षक दास याने नेस्टर डायसचा वेगवान फटका अडवून धेंपोला आघाडी दुप्पट करण्याची संधी नाकारली. अखेरीस ७३व्या मिनिटाला योगेश कदमने धेंपोचा दुसरा गोल लगावला. सलग तिसर्‍या विजयासह धेंपोचा संघ तीन सामन्यांतून ९ गुणांसह अव्वल स्थानी आहे.