राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आपण आपल्या कुटुंबीयांबरोबर चर्चा केल्या शिवाय घेणार नसल्याचे माजी पर्यटनमंत्री ख्रि. माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी तथा मुख्याध्यापिका अलिना साल्ढाणा यांनी सांगितले.
श्रीमती अलिना यांची रविवारी कासावली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता त्या म्हणाल्या, की राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा विचार आपण यापूर्वी कधीच केला नव्हता. परंतु नेहमीच आपण आपल्या पतीच्यामागे खंबीरपणे उभी राहिले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेल्या वचननाम्याची पूर्तता शक्य तो लवकर करण्याची तळमळ त्यांना होती.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हीच खरी श्रध्दांजली असल्याचे श्रीमती साल्ढाणा म्हणाल्या. घरी माणसे यायला लागतात तेव्हा आपण सर्व विसरून जाते. परंतु एकांत असताना मात्र स्मृती जिवंत होऊ लागतात असे त्यांनी बोलून दाखविले. मंत्री झाल्यानंतर सुध्दा माथानी आपल्या शाळेबद्दल आवर्जुन चौकशी करीत होते. मला एकांत बसून विचारात मग्न व्हायचे नसून त्यासाठी मंगळवारपासून मी शाळेत शिकवायला जाणार आहे, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.