इंद्रियाच्या स्वास्थ्याची काळजी त्वचा

0
186

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

त्वचेखालील फाजील मेद कमी होऊन त्वचा घट्ट राहण्यासाठी दोन चमचे कुळथाचे पीठ लिंबाच्या रसात एकत्र करून साबणाऐवजी वापरावे.
त्वचा निरोगी व तेजस्वी बनविण्यासाठी दूध, लोणी, तूप, मध, केशर, हळद वगैरे त्वचापोषक व रक्तशुद्धी करणार्‍या गोष्टींचे नियमित सेवन करावे.

सर्वशरीरवर्ति स्पर्शनेंद्रियं इत्यभिधीयते |
सर्व शरीर व्यापून राहणारे त्वचा हे एकमेव ज्ञानेंद्रिय आहे, ज्याने स्पर्शाचे ज्ञान होते. ज्याने स्पर्शाचे ज्ञान होते.
त्वचेची उत्पत्ती – आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ….
गर्भे शुक्रशोणितस्याभिपच्यमानस्य क्षीरस्य
सन्तानिका इव सप्त त्वचो भवति |
ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते त्याप्रमाणे पुरुषबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना, रक्ताचे पचन होत असताना येणारी साय म्हणजे त्वचा. म्हणूनच रक्तधातू जितका शुद्ध असेल तेवढी त्वचा अधिक तेजस्वी व नितळ असते. त्वचा मांसधातूचा उपधातूही आहे. म्हणजेच आहारापासून मांसधातू तयार होतो किंवा त्याचे पोषण होते तेव्हा त्वचेचेही पोषण होत असते. म्हणजेच त्वचेच्या स्वास्थ्यासाठी आहाररस किंवा रसधातू हा महत्त्वाचा घटक आहे. नितळ नाजूक व सतेज कांतियुक्त त्वचा ही रसधातू उत्तम व सारवान असल्याचा पुरावाच होय. चुकीच्या आहार-विहाराने रस-रक्तामध्ये दूषित द्रव्ये, अनावश्यक द्रव्ये साठत गेली की त्याचे पडसाद हलके हलके त्वचेवर उमटायला सुरुवात होते.
सुश्रुताचार्यांनी त्वचेचे सात थर सांगितले आहेत. सर्वांत वरची अवभासिनी त्वचा सर्व प्रकारचे वर्ण दर्शविते व पाच प्रकारची अंगकांती प्रकट करते. याखेरीज लोहिता, श्‍वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी व मांसधारा अशा त्वचा व त्यांचे वर्णन सापडते.

त्रिदोषांपैकी वातदोष व पित्तदोष दोघांचेही त्वचा हे स्थान सांगितले आहे. औषध शरिरामध्ये प्रवेशित करण्यासाठी त्वचा हे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणजेच औषधी तेलाने अभ्यंग करणे, औषधी द्रव्यांचा शरीरावर लेप करणे, तसेच औषधांबरोबर तांदूळ, उडीद, कुळीथ वगैरे धान्ये शिजवून त्यांच्या साहाय्याने शरीरावर मसाज करणे व आतील शरीरघटकांची झीज भरून काढण्याचा प्रयत्न करणे. अशा अनेक प्रकारे त्वचेचा उपयोग आयुर्वेद शास्त्राने करून घेतलेला आहे. या सर्व उपायांनी त्वचेचे पोषण तर होतेच पण त्वचेतील वात व पित्तदोषाच्या साहाय्याने हे औषधी घटक शरीराच्या आतपर्यंत पोचवले जातात व अपेक्षित कार्यसिद्धी करू शकतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे त्वचा कोरडी, खरबरीत होते. काही वेळा त्वचेला भेगाही पडतात. त्वचेचा रंग काळवंडतो. पित्ताच्या असंतुलनामुळे त्वचेचा रंग विकृत होतो. त्वचेवर लालसर किंवा पिवळसर छटा येतात. या दोन्ही दोषांमुळे रक्त दूषित झाले तर मात्र एक्झिमा, सोरीऍसिस, मुखदूषिका, रॅशेस आदी त्वचेचे रोग होऊ शकतात. शरीरात रक्त कमी झाल्यासही त्वचा निस्तेज व पांढरीफटक पडते.

त्वचा दूषित होण्याची कारणे….
* विरुद्ध अन्न खाण्याने उदा. दूध व फळे (फ्रूटसलाड, केळाचे शिकरण), दूध व खारट पदार्थ (टोस्ट, पाव, चपाती दुधाच्या चहात बुडवून खाणे), मध व गरम पाणी पिणे, तूप व मध सममात्रेत घेऊन खाणे, तेलकट-पचायला जड असे पदार्थ अतिप्रमाणात खाणे, मांससेवन, मद्यसेवन अशा तमोगुणात्मक पदार्थांचे अतिसेवन करणे.
* अजीर्ण, जेवण पचलेले नसताना जेवणे.
* भूक नसताना अतिप्रमाणात जेवणे, त्याचबरोबर भूक असतानाही अल्प प्रमाणात जेवणे.
* पूर्ण भोजनानंतर आईसक्रीम किंवा कोल्ड्रिन्कसारखे थंड पेय किंवा गुलाबजाम, रबडी, रसगुल्ला सारखी स्वीट डीश खाणे.
* मलमूत्र, शिंका, उलटी यांचे वेग आले असता धारण केल्याने व या वेगांचे वेग नसतानाही प्रवर्तक करण्याने.
* जड जेवणानंतर अतिश्रम केल्याने.
* उन्हात अधिक काळ राहिल्याने.
* खूप गरम अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाण्याने.
* पूर्ण उपवास करण्याने
* शारीरिक श्रमानंतर किंवा भीतिमुळे घाम आल्यानंतर लगेच थंड पाणी पिण्याने.
* दही, मासे, आंबट, खारट पदार्थांचे अतिसेवन करण्याने.
* उडीद, मुळा, वांगी, तीळ, मीठ यांचे अतिसेवन करण्याने.
* दिवसा झोपल्याने किंवा जेवल्यानंतर लगेच झोपल्याने.
* ताप, संताप, चिडचिड याचबरोबर आदरणीय, पूजनीय व्यक्तींचा अपमान केल्यानेही त्वचारोग होतात. असे आयुर्वेद शास्त्रात वर्णन आढळते.
त्वचेचे स्वास्थ्य बिघडल्यास दिसणारी लक्षणे …
– त्वचा नेहमीपेक्षा अधिक चिकट किंवा कोरडी होणे.
– त्वचेवर प्रमाणापेक्षा अधिक घाम येणे किंवा घाम येणे पूर्णपणे बंद होणे.
– शरीराचा वर्ण बदलणे
– जखम झाल्यावर भरून येण्यास जास्त वेळ लागणे
– व्रण भरून आल्यावरही त्वचेचा रंग पूर्ववत न होणे
अशी लक्षणे दिसत असल्यास शरीरातील रक्तदोष दूषित होण्यास सुरुवात झाली हे समजावे व त्यानुसार खाण्यापिण्यावर व वागण्यात योग्य तो बदल करावा.
त्वचेच्या स्वास्थ्यासाठी काळजी …
– लोणी, तूप व दूध यांचे दररोजच्या जेवणात सेवन करावे. लोणी हे वर्ण सुधारावयास उत्तम. तूप हे उत्तम कांतीसाठी लाभदायक व दूध हे सर्वच शरीरघटकांचे पोषण करणारे जीवनीय रसायन आहे.
– चांगल्या प्रतीच्या आयुर्वेदिक तेलाने किंवा तिळ तेलाने रोज अभ्यंग करणे
– वर्ण्य औषधी द्रव्यांचा वापर करून उदा. चंदन, हळद, निंब, कोरफड, केशर, ज्येष्ठमध, वाळा, मंजिष्ठा, अनंत घालून तयार केलेले उटणे लावावे. आंघोळीपूर्वी तेलाची मालीश केल्यास कोणत्याच सौंदर्यसाबणाची गरज भासत नाही.
– त्वचेवर लावण्यासाठी दुधावरची साय किंवा ताज्या कोरफडीचा रस, नारळाचे दूध, चण्याचे पीठ हे बॉडी शॅम्पू किंवा साबणाचे कार्य करू शकतात.
– पंचकर्मांपैकी विरेचन व अनुवासन बस्तीचा खूप चांगला उपयोग होतो. याकरता रोज मृदू विरेचन घेण्यासही हरकत नाही. तसेच आठवड्यातून एक वेळा अनुवासन बस्ती घेऊ शकता. पंचकर्माने एकूणच शरीराचा कायाकल्प होत असल्याने त्वचेचे वयपण कमी होऊन त्वचा सुंदर व आकर्षक होते.
– शहाळ्याचे पाणी नियमित सेवन केल्यास त्वचा सतेज राहण्यास मदत होते व शहाळ्याची मलई चेहर्‍यावर चोळून लावल्यास अकाली पडलेल्या सुरकुत्या कमी होतात.
– रोज चिमूटभर केशराची पूड दुधातून घेतल्यास त्वचा उजळण्यास मदत होते.
– जवाच्या पीठात गुलाबाच्या पाकळ्यांचे चूर्ण, मेथ्यांचे चूर्ण, हळद-जिर्‍याची पूड टाकावी व तयार झालेले मिश्रण चेहरा धुण्यासाठी वापरावे. याने धूळ, प्रदूषणामुळे दूषित झालेली त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
– दोन चमचे बेसन, पाव चमचा हळद, एकत्र करून आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी वापरल्यास त्वचा सतेज, मऊ व निरोगी होते.
– त्वचा कोरडी झाल्याने फुटत असल्यास दुधाची साय किंवा लोणी किंचित हळदीसह हलक्या हाताने चोळावे.
– त्वचेखालील फाजील मेद कमी होऊन त्वचा घट्ट राहण्यासाठी दोन चमचे कुळथाचे पीठ लिंबाच्या रसात एकत्र करून साबणाऐवजी वापरावे.
– त्वचा निरोगी व तेजस्वी बनविण्यासाठी दूध, लोणी, तूप, मध, केशर, हळद वगैरे त्वचापोषक व रक्तशुद्धी करणार्‍या गोष्टींचे नियमित सेवन करावे.