मालिकांमधून चांगला बोध घेणे गरजेचे

0
310
  • देवेश कु. कडकडे

१९७२ साली मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. आणि तेव्हापासून दूरदर्शनवर मनोरंजनाची मालिका सुरू झाली. भारतात तेव्हा दूरदर्शनच्या आगमनाने सर्वत्र एक नवीन चैतन्य निर्माण झाले. मोजक्याच घरात दूरदर्शन संच दिसू लागले. त्यामुळे तिथे संध्याकाळी, शेजार्‍यापाजार्‍यांची कार्यक्रम बघण्यास प्रचंड गर्दी लोटायची. चित्रपटगृहात उडणारी झुंबड तिकिटांसाठी लांबलचक रांगा, कधीकधी त्यावरून वादावादी, हणामारी यामुळे प्रेक्षकांना मनस्ताप व्हायचा. त्यावेळी चित्रपट बघणे हा एक कौंटुबिक सोहळा होता. त्यामुळे दूरदर्शनवर घरबसल्या भले ते जुने चित्रपट असले तरी दर्जेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळायची; परंतु यालासुद्धा एक मर्यादा होती. शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी अशा ठराविक दिवशी चित्रपट आणि सायंकाळी वेगवेगळ्या विषयाच्या दर्जेदार मालिकांची रेलचेल असायची. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि रुची कायम असायची. २५-३० वर्षापूर्वी दूरदर्शन हे कुटुंबाने एकत्र येऊन बघण्याचे साधन होते. कालांतराने त्याला भयानक स्वरूप प्राप्त झाले.

यंत्रयुग आणि प्रगती यामुळे नवीन संकल्पना उदयास आल्या. दूरचित्रवाणी क्षेत्रात क्रांती झाली. आज हे क्षेत्र मर्यादा ओलांडून जगभर पोचले आहे.
सुरुवातीच्या काळात मुंबई दूरदर्शन वाहिनीवर ‘श्‍वेतांबरा’ ही १३ भागांची रहस्यमय मालिका लोकप्रिय ठरली होती. पुढे राष्ट्रीय वाहिनीवर ‘नुक्कड, वागले की दुनिया, करमचंद, जीवनरेखा, बुनियाद’ सारख्या मालिकांनी निव्वळ मनोरंजनाबरोबर समाजातील वास्तव समोर आणलेे. रामायण, महाभारत सारख्या मालिकांना तर रस्ते सामसूम करण्याचे भाग्य लाभले होते; परंतु पुढे खासगी वाहिन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे आणि त्यांच्यात ‘टीआरपी’ वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्यामुळे मालिका, चित्रपट, रिअलिटी शो यांचा दिवसरात्र भडीमार सुरू झाला.

सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या कन्या एकता कपूर यांनी डेली सोप हा मालिकांचा प्रकार कमालीचा लोकप्रिय केला. त्यांच्या ‘क’ अक्षरापासून सुरू होणार्‍या शीर्षकाच्या मालिकांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या त्यातूनच प्रसिद्धीस आल्या. तोच कित्ता अनेक निर्मात्यांनी गिरवला आणि असल्या दैनंदिन मालिकांचा ओघ सुरू झाला. अर्थात या मालिकांचा दर्जा काय, हा वादाचा तसा तितकाच संशोधनाचा विषय आहे. या मालिका किती भागात संपवायच्या याला कसलीच मर्यादा नाही.
यातील काही प्रमुख भूमिकेचे कलाकार बदलले जातात, कारण त्यांना प्रसिद्धीमुळे चित्रपटात कामे मिळतात आणि ते या मालिकांना वेळ देऊ शकत नाहीत. या मालिका निदान ५२ भागांत संपवण्याचा मापदंड प्रस्थापित केला पाहिजे. मारुतीच्या शेपटीप्रमाणे हे भाग वाढवून आणि कथेच्या मर्यादेपलीकडे जाऊन प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्या कथेशी प्रामाणिक राहण्याची आवश्यकता दिग्दर्शकाला वाटत नाही. मग त्या कथा सामाजिक, पौराणिक अथवा ऐतिहासिक असोत; कमी अधिक प्रमाणात याबाबत सारख्याच असतात.

वास्तविक, ऐतिहासिक, पौराणिक पार्श्‍वभूमी असलेल्या किंवा एखाद्या असामान्य व्यक्तिरेखेवरील कथाभागाला मालिकांमधून पूर्ण न्याय देता येतो. विषय मोठा असला की, चित्रपटाची मर्यादा प्रकर्षाने जाणवते. तोच विषय मालिकांमधून सविस्तर आणि प्रभावीपणे मांडता येतो. म्हणून त्या किती लांबवायच्या यालाही सीमा असते.

अनेक पौराणिक, ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या सोयीनुसार बदल घडवून अथवा प्रसंग रंगवून अनेक धक्का देणारे प्रसंग मालिकेत प्रेक्षकांच्या माथी मारले जाऊ लागले आहेत. अनेक वास्तववादी कथांत विनाकारण काल्पनिक प्रसंग घुसडले जातात. त्यामुळे वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. मोठ्या उत्सुकतेने या मालिका बघताना त्या ऐतिहासिक म्हणून त्याचा अभिमान बाळगावा की वाहत जाते म्हणून कींव करावी असा प्रश्‍न निर्माण होतो.

सामाजिक विषयावरच्या मालिकांमध्ये कौंटुबिक विषयाचे पेव अधिक फुटले आहे. निर्माता-दिग्दर्शक कथेचा भाग असा काही फिरवतात. तो प्रेक्षकांना आपल्या जीवनाचा सुखदु:खाचा भाग वाटतो. त्यामुळे मालिकांमधील कथांतील पात्रे आणि प्रेक्षक यांच्या दरम्यान एक कृत्रिम नाते निर्माण होते. कथेतील पात्रे केवळ पडद्यावर राहत नाहीत, तर आपल्याशी जोडली जातात. महिला वर्ग विशेष करून असल्या मालिकांना घट्ट कवटाळून बसतात. मालिकांमधील पात्रांचे स्वभाव गुण, त्यांच्या स्वभावधर्मावर खासगीत चर्चासत्रेही घडतात. वृत्तवाहिन्या या मालिकांविषयी कधी कधी या पात्रांचे उदात्तीकरण करण्याचा भंकसपणा करतात. आज सर्वत्र एकलकोंडेपणा वाढल्यामुळे सामान्य माणूस यात गुंतून जातो. त्याला या पात्रांच्या अनुभवात, भावनात सहभागी व्हावे असे वाटते.

या मालिकांना कुठल्याही विषयाचे वावडे नाही. अगदी बारशापासून मृत्यूपर्यंत, सर्व सोळा संस्काराचे धार्मिक विधी सविस्तर दाखवले जातात. ईद, ख्रिसमस तसेच सर्व बारीकसारीक सण मालिकांमध्ये अगदी धुमधडाक्यात साजरे केले जातात. या मालिकांत कोणीही प्रसन्न दिसत नाही. विशेष करून महिलांना खलनायक म्हणून सादर करून मालिका वेगळे वळण देऊन महिलावर्गाला खिळवून ठेवले जाते. याचा समाजमनावर काय प्रभाव पडेल, याचे कोणालाच सोयरसुतक नसते. तसेच समाजात अकस्मात घडणार्‍या घटनांचा संदर्भ घेऊन या कथांना अकस्मात वळण दिल्याने त्या कधी कधी हास्यास्पदही बनतात.

पुढे या मालिकांचे ५००-१००० भाग पूर्ण झाल्यावर तो साजरा करण्याचे निमित्त साधून दोन तासांचा विशेष भाग सादर केला जातो. नंतर यातील उत्साह कमी होऊन प्रेक्षक कंटाळतात; परंतु निर्माते कंटाळलेले दिसत नाहीत. मध्यंतरी ‘बिगबॉस’ नामक एक विचित्र रिअलीटी शो वादग्रस्त सादरीकरणामुळे चर्चेत होता. यात काही प्रसिद्ध, जास्त करून कुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा सहभाग असतो. आणि हे वर्षानुवर्ष चालत आहे. शेवटी मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर व्यवसाय चालतो. हे असले व्यवसाय चालवणारे प्रचंड पैसा कमावतात आपण मात्र यातून विकृतींना आपल्या दारात थारा देतो. दूरदर्शन क्षेत्रातील क्रांतीमुळे त्याचे अनेक फायदे आहेत. जगभरात घडणार्‍या घटना काही क्षणांतच आपल्यापर्यंत पोचतात. अनेक शैक्षणिक वाहिन्यांमुळे विद्यार्थ्यांना विविध माहितीचे भांडार खुले झाले आहे. जगात सर्वत्र चांगले आणि वाईट पसरलेले आहे त्यातून आपण काय उचलावे, हे आपल्या हाती आहे. आणि भावी पिढीसमोर कोणता आदर्श ठेवणार हे तर आपण पालक ठरविणार आहोत. या मालिकांपासून कोणता बोध घ्यावा हे आपल्यावर आहे.