Home Featured सुमन सुगंध

सुमन सुगंध

0

संगीतक्षेत्रातला ‘सुमनसुगंध’ काल अचानक हरपला. आशा भोसले यांच्या पाठोपाठ सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने सिनेसंगीताचे आणखी एक ओजस्वी पर्व लयाला गेले. आपल्या अत्यंत नाजूक, मखमली आवाजामुळे ‘प्रति लता’ अशीच त्यांची ओळख बनली आणि त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या आवाजाला जेवढा न्याय मिळायला हवा होता तो मिळाला नाही ही खंत आता नक्कीच मागे उरेल. त्यांनी गायिलेली अनेक गीते आजही लतादीदींची समजून ऐकली आणि वाखाणली जातात. 1962 सालच्या ‘बात एक रात की’मधील ‘ना तूम हमें जानो’ असो, 1965 सालच्या ‘जब जब फूल खिले’ मधले ‘ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे’ असो अथवा 68 सालच्या ‘ब्रह्मचारी’ मधले ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’असो, अनेकांना ही गाणी लतादीदींचीच वाटतात, एवढे साधर्म्य त्यामध्ये जन्मजात आहे. ते काही जाणूनबुजून केलेले अनुसरण किंवा नक्कल नव्हे. ऐंशीच्या दशकात तर एकदा दूरदर्शनवर ‘छायागीत’ कार्यक्रमात ‘ना ना करते’ हे रफींबरोबरचे गाणे लता मंगेशकर यांच्या नावाने दाखवले गेल्यावर अस्वस्थ झालेल्या सुमन कल्याणपुरांच्या कन्या चारुल यांना प्रसार भारतीला फोन लावून ती चूक दाखवून द्यावी लागली होती. केवळ हिंदीतील गाण्यांच्या बाबतीतच नव्हे, अगदी त्यांनी गायिलेल्या मराठी भावगीतांबाबत देखील अनेकांचा हा गोंधळ उडतो. त्यांनी गायिलेल्या आणि गाजलेल्या मराठी गीतांची ही यादी पाहा – ‘जिथे सागरा धरणी मिळते,’ ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर’.. एखाद्याला ही गाणी लतादीदीच गात आहेत असे वाटले तर त्याची चूक म्हणता येणार नाही एवढा त्याच जातकुळीचा स्वरांचा गोडवा त्यामध्ये आहे. सुमन कल्याणपूर या मूळच्या मंगळुरी सारस्वत. माहेरचे नाव सुमन हेम्माडी. रामानंद कल्याणपूर ह्या उद्योजकाशी लग्नानंतर त्या कल्याणपूर बनल्या. 1937 साली पूर्व बंगालात त्यांचा जन्म झाला होता. ते गाव आज बांगलादेशात आहे. त्यांचे शिक्षण मात्र मुंबईत झाले. पाच बहिणींत त्या मोठ्या. त्यांचा गोड गळा पाहून वडिलांच्या मित्राने त्यांना मुलीला संगीतशिक्षण देण्याचा आग्रह केला. आपल्या ‘सुमनसुगंध’ ह्या आत्मचरित्रात त्यांनी आपली जीवनकहाणी विस्ताराने सांगितली आहे. वडिलांचे मित्र डी. बी. जोग यांनी आपल्या ‘शुक्राची चांदणी’ ह्या मराठी चित्रपटासाठी त्यांच्याकडून पहिल्यांदा पार्श्वगायन करून घेतले, पण तो चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. पण ‘सुमना’चा सुगंध काही लपून राहतो थोडाच. तो चित्रपटसृष्टीपर्यंत जाऊन पोहोचला आणि एकेका पार्श्वगायनाची संधी त्यांना मिळत गेली. लता मंगेशकर त्यांच्या आधी चित्रपटसृष्टीत येऊन स्थिरावल्या होत्या. त्यांच्या आवाजाशी ह्यांच्या आवाजाचे असलेले साधर्म्य लक्षात घेऊन पर्याय म्हणूनही अनेकांनी त्यांना संधी दिली. परंतु आपल्या गोड गळ्याने, पूर्ण तन्मयतेने त्यांनी ती गीते गायिली आणि लता मंगेशकर ह्या नावाचा करिष्मा सर्वत्र पसरलेला असतानाही जाणकारांमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली हे नमूद करणे गरजेचे आहे. त्यांची कित्येक गाणी त्यातील गोडव्यामुळे आपल्या ओठांवर राहतात. ‘फरियाद’ मधले स्नेहल भाटकर ह्या मराठमोळ्या संगीतकाराने संगीत दिलेले ‘हाल ए दिल उनको सुनाना था, सुनाया न गया’ ऐकल्यावर कोण ते विसरू शकेल? ज्या गाण्याने त्यांना एकेकाळी फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला ते ‘बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है’ हे आजही रक्षाबंधनला वाजतेच वाजते! मराठीतही सुमन कल्याणपूर यांनी ‘सांग कधी कळणार तुला’ किंवा ‘मृदुल करांनी छेडित तारा’ सारखी उत्तमोत्तम भावगीते तर गायिली आहेतच, पण त्याच बरोबर ‘उठा उठा चिऊताई’ सारख्या गोड बालगीतापासून ‘ ॐकार प्रधान रूप गणेशाचे,’ किंवा ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ सारख्या गाजलेल्या भक्तिगीतांपर्यंत नानाविध प्रकारची गाणी त्यांनी गायिली आणि ती गाजली. एवढे मोठे कर्तृत्व असूनही प्रसिद्धी पराङ्मुखता हा त्यांचा विशेष होता. आपली अदब त्यांनी सदैव जपली. आजच्या रिअलिटी शोंना हजेरी लावून स्वतःला सतत प्रसिद्धीच्या झोतात त्या सहज ठेवू शकल्या असत्या. परंतु त्यांनी तो मोह कटाक्षाने टाळला. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांच्यात संघर्ष रंगवण्याचाही प्रयत्न सतत होई, परंतु त्यांनी कधीही त्यात तेल ओतणारी विधाने केली नाहीत. ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीत पं. नेहरूंपुढे आपण गाणार होते, परंतु ऐनवेळी आपल्याला दुसरे गीत दिले गेले’ ही व्यथा मात्र त्यांनी एकदा नांदेडच्या मुलाखतीत बोलून दाखवली होती. गोड गळ्याची आणि तितक्याच गोड, खानदानी व्यक्तिमत्त्वाची ही ज्येष्ठ गायिका आता आपल्यातून निघून गेली आहे. मागे उरला आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आणि आठवणींचा सुगंध!