Home Featured काँग्रेसमध्ये खांदेपालट

काँग्रेसमध्ये खांदेपालट

0

गोवा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना काँग्रेस श्रेष्ठींनी आपले गोवा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय नुकताच घेतला. अमित पाटकर यांच्याकडून तडकाफडकी प्रदेशाध्यक्षपद काढून घेऊन ते पुन्हा एकदा गिरीश चोडणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षेनुरूप यश प्राप्त न झाल्याने चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तो स्वीकारून पक्षश्रेष्ठींनी तेथे अमित पाटकर यांना आणले होते. परंतु पाटकर यांच्या काळात काँग्रेसची अधिकच घसरण झाली. जे अकरा आमदार निवडून आलेले होते, त्यापैकी आठजणांनी पक्षांतर केल्याने काँग्रेसजवळ जेमतेम तीन आमदार राहिले, तेही प्रामुख्याने त्यांच्यावर असलेल्या ख्रिस्ती मतदारांच्या दबावामुळे. पाटकर यांनी आपल्या कार्यकाळात काही आंदोलने वगैरे केली, परंतु ते सरकारच्या विरोधात प्रखर भूमिका घेत नाहीत अशी टीका त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्यांच्यावर करीत होते. पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक जिंकता येणार नाही अशा कागाळ्याही श्रेष्ठींच्या कानी गेल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची माळ गिरीश चोडणकर यांच्यासारख्या निष्ठावंत आणि तळागाळातून वर आलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यात पडली आहे. तामीळनाडूत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे ते पक्षप्रभारी होते. तेथे काँग्रेस द्रमुक आघाडीचा भाग होती. निवडणूकही त्यांनी सोबतीने लढवली, परंतु निवडणुकीत अभिनेता विजय याच्या टीव्हीकेने द्रमुकचा धुव्वा उडवताच रातोरात काँग्रेसने द्रमुकची आघाडी सोडून टीव्हीकेला पाठिंबा देऊन टाकला. काहीही करून पक्षाला सत्तेत आणण्याच्या ह्या कामी अर्थातच गिरीश चोडणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर निखालस खुष झाले असतील तर नवल नाही. त्यामुळे गोव्यातही असा चमत्कार करून दाखवण्यासाठी त्यांच्या घोड्यावर पक्षश्रेष्ठींनी आकडा लावला आहे. पाटकर यांच्या तुलनेत गिरीश चोडणकर हे अनुभवी आहेत. पक्षाच्या तळागाळात संघटना कशी बांधावी ह्याचा त्यांना युवक काँग्रेसचे पदाधिकारी असल्यापासूनचा अनुभव आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ते निकटवर्ती आहेत. आजकाल राजकीय पक्षामध्ये राष्ट्रीय नेत्यांशी असलेल्या ह्या जवळिकीला फार महत्त्व असते. गोव्यातील सध्याचे वातावरण पाहिले तर भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक विशेषतः दक्षिण गोव्यात आव्हानात्मक असणार आहे. फुटिरांच्या जोरावर राज्यात भरभक्कम बहुमत जरी पक्षाने मिळवले असले, तरी निवडणुकीमध्ये जनता फुटिरांचा सफाया करते हे मागील निवडणुकीतही दिसून आलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीला सामोरे जाणाऱ्या भाजपला आव्हान उभे करण्याची काँग्रेसला संधी आहे. खरे तर काँग्रेससाठी ही अखेरची संधी आहे. अस्तित्वाची लढाई आहे. ह्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला उघडे पाडून धडा शिकवण्याचा चंग चोडणकर यांनी बांधला आहे. काँग्रेस पक्षाचे एकवीस आमदार आणू; भाजपला सहा जागाही जिंकता येणार नाहीत अशी गर्जना त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्या झाल्या केली आहे. अर्थात, अशा घोषणा करणे वेगळे आणि त्यासाठी प्रत्यक्ष बूथ पातळीवर संघटनात्मक जाळे सज्ज असणे वेगळे. चोडणकर यांच्या निवडीने पक्षांतर्गत खदखद सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना आधी ती खदखद दूर करून पक्षसंघटना नव्याने बांधावी लागेल. पाटकर यांनी जवळ केलेल्या पदाधिकाऱ्यांनी चोडणकरांच्या निवडीनंतर राजीनामास्त्र उगारले आहे. खासदार विरियातो हे देखील आपल्याला विश्वासात न घेता केल्या गेलेल्या बदलामुळे नाराज आहेत. चोडणकर यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धीही आहेतच. ह्या सगळ्यांची नाराजी दूर करून पक्षसंघटना कमीत कमी काळात बांधण्याचे आणि तिला बहुधा मुदतपूर्व होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे आव्हान चोडणकरांपुढे असेल. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. खरे तर गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला हे करता आले असते, परंतु ते घडले नाही. भाजपला पराभूत करायचे असेल तर सर्व विरोधी पक्ष एकत्र आणावेच लागतील हे शहाणपण चोडणकर यांना आहे. परंतु त्याला गोवा फॉरवर्ड सोडल्यास कोण राजी होईल हे पाहावे लागेल. आम आदमी पक्षाने आधीच ‘एकला चलो रे’ ची घोषणा करून टाकली आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात तर उभी फूट पडली आहे. त्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी चोडणकर कसे रणनीती आखतात हे पाहावे लागेल. गोव्यातील काँग्रेसची स्थिती दयनीय आहे. सरकारविरुद्ध एवढी मोठमोठी प्रकरणे उजेडात येऊनही काँग्रेसला प्रखर आंदोलने उभी करता आली नाहीत. विधानसभा निवडणुकीसाठी सज्जता तर दूरच, आधी हाताशी असलेल्या मोजक्या काळात पक्षसंघटनेची पुनर्बांधणी करून काँग्रेसमध्ये नवे प्राण फुंकण्याचे पहिले मोठे आव्हान चोडणकर यांच्यापुढे आहे.