काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून तडकाफडकी हटवल्याने अमित पाटकर नाराज
निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असताना अमित पाटकर यांना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावरून पदच्युत करून गिरीश चोडणकर यांची या पदावर वर्णी लावण्यात आल्याने पाटकर हे बरेच नाराज झालेले असले, तरी त्यांनी आपणाला सध्या तरी या विषयावर काहीही बोलायचे नसून आपण दिल्लीत पक्ष श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतरच याबाबत बोलू शकणार असल्याचे काल स्पष्ट केले. मात्र, भावूक होऊन आपल्या भावना व्यक्त करताना समाजासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने आपण कित्येक गोष्टींचा त्याग करून राजकारणात आलो होतो, असे स्पष्ट करून आपला लढा हा यापुढेही चालूच राहणार असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षपदावर असताना पक्षासाठीची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर होती. त्यामुळे व्यस्त दिनचर्चेमुळे कुडचडे मतदारसंघातील लोकांसाठी हवा तेवढा वेळ देऊ शकत नव्हतो. आता आपणाला उसंत मिळणार असून, कुडचडे मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या व अडीअडचणी समजून घेता येणार असल्याचे पाटकर म्हणाले.
2022 साली झालेली गोवा विधानसभा निवडणूक व त्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पदावरून हटवून त्या जागी अमित पाटकर यांची वर्णी लावली होती. आणि गेली सुमारे चार वर्षे पाटकर हे गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होते. मात्र, आता निवडणुकीपूर्वीच आपणाला पदच्युत करण्यात आल्याने पाटकर व पक्षातील त्यांचे समर्थक हे नाराज झाले आहेत. दुसऱ्या बाजूला गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याने त्यांच्या गटातील समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.