बँकेचे अधिकारी असल्याचे भासवत अमेरिकन नागरिकांची करत होते फसवणूक
वेर्णा पोलीसांनी वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका भाड्याच्या जागेतून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला असून, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून बनावट ओळख धारण करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी 26 जणांना अटक केली आहे.
विश्वसनीय माहितीच्या आधारे, वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद एल. शिरोडकर, उपनिरीक्षक महेश भोमकर, उपनिरीक्षक डेव्हिड कोस्टा, उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस, उपनिरीक्षक प्रिस्ली कार्व्हालो, सहाय्यक उपनिरीक्षक निवेद गावकर, हवालदार सुधीर तलेकर, अजित शिरोडकर, कॉन्स्टेबल जगदेव धोत्रेकर, आकाश यादव, सादिक इंगळगुंडी, उपनिरीक्षक सैली नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील मिलाग्रोस क्वा प्रा. लि. येथील प्लॉट क्रमांक 98 वर पहाटे 3 ते 6.15 च्या दरम्यान छापा टाकला. छाप्यादरम्यान, त्या जागेतून एक बेकायदेशीर कॉल सेंटर चालवले जात असल्याचे आढळून आले. संशयित हे अमेरिकन बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून, अमेरिकन नागरिकांना खोट्या सबबीखाली पैसे भरण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक करत असल्याचे आढळले. अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी व्हीपीएन कॉलिंग आणि स्पूफिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. त्यांनी अमेरिकन बँकांचे अधिकारी असल्याचे भासवून, त्यांना गिफ्ट कार्डद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले.
घटनास्थळावरून 145 लॅपटॉप, 45 मोबाईल फोन, राउटर, हेडफोन आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. वेर्ना पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याचे एकूण मूल्य अंदाजे 55 लाख रुपये आहे. या प्रकरणी एकूण 26 जणांना अटक करण्यात आली असून, ते नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यासारख्या विविध राज्यांचे रहिवासी आहेत. हे सर्वजण साकवाळ येथील ओशन व्ह्यू अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते.
सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना वास्को येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या टोळीत सामील असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. जप्त उपकरणांचे सायबर फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.