आझाद मैदानावरील जाहीर सभेची परवानगी रद्द केल्याने निर्णय; लिंक लवकरच उपलब्ध
पणजी महापालिका प्रशासनाने आझाद मैदानावरील जाहीर सभेची परवानगी रद्द केल्याने शनिवार दि. 30 मे रोजी गोवा घटक राज्य दिनी आभासी पद्धतीने जाहीर सभा घेण्याचा निर्णय ‘इनफ इज इनफ’ संघटनेच्या कोअर समितीच्या बैठकीत काल घेण्यात आला. या जाहीर सभेची लिंक लवकरच उपलब्ध केली जाणार आहे, असे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पणजी महानगरपालिका प्रशासनाने ‘इनफ इज इनफ’ संघटनेला 30 मे रोजी आझाद मैदानावर जाहीर सभा घेण्यासाठी 21 मे रोजी दिलेली परवानगी 25 मे रोजी रद्द केली होती. राज्य सरकारने घटक राज्य दिनानिमित्त आझाद मैदानावर एक प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इनफ इज इनफ या संस्थेला सभेसाठी दिलेली परवानगी रद्द केली जात आहे, असे कळविण्यात आले होते.
आभासी पद्धतीने सभा घेण्याच्या निर्णयापूर्वी काल सकाळी ‘इनफ इज इनफ’ संघटनेचे पदाधिकारी देविदास आमोणकर, गोविंद शिरोडकर आणि एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी ही सभा आयोजित करण्यावर आम्ही ठाम आहोत असे स्पष्ट केले होते; मात्र सभेचे स्थळ नंतर जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले होते.
इनफ इज इनफ या संघटनेच्या कोअर समितीच्या बुधवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत पणजी महानगरपालिकेने सभेसाठी दिलेली परवानगी रद्द केल्याने निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. जाहीर सभेला दिलेली परवानगी रद्द केली तरी मागे न हटण्याचा निर्णय घेऊन आभासी पद्धतीने सभा घेण्याचे ठरविण्यात आले.
या आभासी पद्धतीच्या सभेत निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्यासह अनेक प्रमुख वक्ते गोव्यातील प्रशासन, पर्यावरण, सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक हित यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर संबोधित करणार आहेत.
इनफ इज इनफच्या जाहीर सभेला दिलेली मान्यता रद्द करण्यात आल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
‘आप’ची मुख्यमंत्र्यांवर टीका
‘इनफ इज इनफ’ संघटनेला आझाद मैदानावर जाहीरसभा घेण्यासाठी देण्यात आलेली परवानगी पणजी महापालिकेने मागे घेतल्याबद्दल आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली आहे. गोव्यातील भाजप सरकार जनतेचा आवाज चिरडू पाहत असून लोकशाही पद्धतीने केल्या जाणाऱ्या आंदोलनाचा गळा घोटू पाहत आहे. आता जनता भाजपविरुद्ध आवाज उठवू लागली असून, 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत हीच जनता भाजपचा पराभव करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी म्हटले आहे.