महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि देशाचे माजी अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नवीन नाव अधिकृतपणे ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.
मधू दंडवते यांचे कोकण रेल्वेसाठी योगदान पाहता त्यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याची अनेक वर्षांची मागणी होती. याबाबत कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला. परिवहन विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकार हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार आहे.
स्व. मधु दंडवते यांनी देशाचे रेल्वेमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम करताना कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. कोकण रेल्वे सुरू व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आणि संसदेबाहेर पाठपुरावा केला. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे कोकण रेल्वे धावू शकली, अशी संपूर्ण कोकणवासीयांची भावना आहे. सावंतवाडी स्थानकाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती.