सांत आंद्रे मतदारसंघ गट समितीकडून पक्षाचे अध्यक्ष मनोज परबांवर टीका
सांत आंद्रेचे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांच्याकडून पक्ष संघटन आणि मतदारसंघासाठी निःस्वार्थपणे कार्य सुरू असताना त्यांच्यावर पक्षातील काही जणांकडून खोटे आणि निराधार आरोप केले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांना आता वीरेश बोरकर हे पक्षात नको आहेत. बोरकर यांना राजकीयदृष्ट्या रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या सांत आंद्रे मतदारसंघ गट समितीचे पदाधिकारी तुषार गावस यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी सांत आंद्रे गट समितीच्या आरोपानंतर आपल्या व्हॉट्सअप स्टेट्सवर ‘पुरो’ अशी प्रतिक्रिया दिली.
सांत आंद्रे आरजीपी गटाने आमदार वीरेश बोरकर यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, आमदार वीरेश बोरकर यांच्यावर करण्यात येणारे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. बोरकर यांच्याकडून त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांना लवकरच उत्तर दिले जाणार आहे, असेही तुषार गावस यांनी सांगितले.
वीरेश बोरकर हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी अफवा पसरविण्यात येत आहे. मनोज परब यांच्या समर्थकांकडून बोरकर यांच्याविरोधात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. बोरकर यांनी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे गावस म्हणाले. वीरेश बोरकर यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. ही नोटीस पाठविण्यापूर्वी सांत आंद्रे मतदारसंघ गटाची बाजू ऐकून घेतलेली नाही, असेही गावस यांनी सांगितले. यावेळी आरजीपीचे सांत आंद्रे गटाचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
सांत आंद्रे गट समितीच्या काही सदस्यांनी पक्ष आणि पक्षाध्यक्ष मनोज परब यांच्यावर केलेले सर्व आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने फेटाळून लावले आहेत. आरजीपीचे अध्यक्ष आणि पक्षाविरुद्ध खोटी वक्तव्ये करणे टाळावे. पक्ष कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा किंवा पक्षांतर्गत बेशिस्त निर्माण करण्याचा कोणताही पुढील प्रयत्न झाल्यास, पक्षाच्या घटनेनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.