Home बातम्या निवती समुद्राच्या तळाशी ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका स्थापित

निवती समुद्राच्या तळाशी ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका स्थापित

0

देशातील पहिल्या अंडरवॉटर म्युझियमचा पहिला टप्पा यशस्वी; दीड वर्षानंतर पर्यटकांना पाहता येणार

कोकणच्या पर्यटन वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मालवण-वेंगुर्लाजवळील प्रसिद्ध निवती रॉक समुद्रात ‘पाण्याखालील संग्रहालय’ (अंडरवॉटर म्युझियम) आणि ‘कृत्रिम समुद्री प्रवाळ बेट’ (आर्टिफिशियल रिफ) तयार करण्यासाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ काल यशस्वीरित्या समुद्रतळाशी स्थापित करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या भागाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती एमटीडीसी कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने यांनी दिली.

भारतीय नौदलातील सेवामुक्त आयएनएस गुलदार या युद्धनौकेचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मालवण-वेंगुर्ला जवळील निवती रॉक परिसरात कृत्रिम समुद्री प्रवाळ बेट व पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर केले जात आहे. या ऐतिहासिक पर्यटन प्रकल्पाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली होती. अनेक अडथळे पार करून आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्रात 45 टक्के बुडाल्यानंतर काळोखामुळे काम थांबविण्यात आले होते. मंगळवारी ही प्रकिया पूर्ण झाली.

आव्हानात्मक परिस्थितीत मोहीम फत्ते
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. समुद्रातील खवळलेले वातावरण आणि लहरी परिस्थितीवर मात करत अखेर ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौकेला समुद्रतळाशी अचूकपणे स्थापित करण्यात आले. ही युद्धनौका दक्षिण दिशेकडे म्हणजेच गोव्याच्या दिशेने तोंड करून समुद्रतळाशी विसावली आहे.

सागरी जीवसृष्टीला जीवदान
समुद्रतळाशी बुडवण्यात आलेल्या या युद्धनौकेचे हळूहळू कृत्रिम प्रवाळ बेटात रुपांतर होणार आहे. या नौकेवर सागरी जीवसृष्टीचा नैसर्गिक अधिवास तयार होण्यासाठी साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे येथील सागरी जैवविविधता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

पर्यटकांना कधी आणि कसे पाहता येणार?
पर्यटकांना ही ऐतिहासिक युद्धनौका समुद्राच्या पोटात पाहण्यासाठी साधारण 1 ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. ही नौका पर्यटकांना खालील दोन माध्यमांतून अनुभवता येईल. प्रस्तावित पाणबुडीद्वारे सामान्य पर्यटकही समुद्राखाली जाऊन ही नौका पाहू शकतील. तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून स्कूबा डायव्हर्सना या युद्धनौकेच्या जवळ जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.