Home बातम्या आमदार गोविंद गावडे – मंत्री रमेश तवडकर यांच्यातील मतभेद मिटले!

आमदार गोविंद गावडे – मंत्री रमेश तवडकर यांच्यातील मतभेद मिटले!

0

आपण एसटी समाज आणि गोव्याच्या हितासाठी दोन पावले मागे घेतली असून, माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्याशी असलेले मतभेद सुध्दा दूर केले आहेत. सभापती डॉ. गणेश गावकर यांच्यासह आम्ही एसटी समाजातील तीनही आमदार ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमात एकत्रित येऊन काम करणार आहेत, असे आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी पर्वरी येथे काल स्पष्ट केले.

एसटी समाजातील तीनही आमदारांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार गोविंद गावडे यांना आपला पूर्ण पाठिंबा राहणार आहे, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले.

आमदार गोविंद गावडे यांच्यासोबत महिनाभरापूर्वी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर आम्ही दोघांनी पूर्वीच्या घटना बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला. समाजहित डोळ्यासमोर ठेवून आपण स्वत:, तसेच आमदार गोविंद गावडे, सभापती डॉ. गणेश गावकर काम करणार आहोत, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले. एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या विषयाचा पाठपुरावा केला जाणार आहे. केंद्रीय पातळीवरून यासंबंधी अध्यादेश लवकर जारी व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहे, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले.

आम्ही दोघांनी काही कारणास्तव एकमेकांवर टीका केली होती. आता, जुन्या वादाला पूर्णविराम देऊन समाज हितासाठी कार्यरत होण्याचा संकल्प केला आहे, असे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.