Home Featured डॉ. केतन भाटीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

डॉ. केतन भाटीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

0

>> अनमोड घाटात सर्पदंश झाल्याने मृत्यू; अकाली निधनाने संपूर्ण गोवा हळहळला; फोंड्यातून आमदार बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे

फोंडा मतदारसंघात समाजकारण आणि राजकारण यांच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले काँग्रेसचे नेते डॉ. केतन भाटीकर (42) यांचे काल पहाटे साडेतीनच्या सुमारास सर्पदंशाने निधन झाले. काही कामानिमित्त दांडेलीला गेल्यानंतर तेथून पुन्हा गोव्यात परतत असताना अनमोड घाटात लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरले. त्याचवेळी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला, तो उचलण्यासाठी गेले असता त्यांना सर्पाने दंश केला. त्यांच्या या आकस्मिक निधनाने फोंडा तालुक्याबरोबर संपूर्ण गोवा हळहळला. केतन भाटीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच पहाटेपासून पहिल्यांदा पिळये आरोग्य केंद्रात, नंतर मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणि त्यानंतर सकाळपासून त्यांच्या फोंड्यातील घरासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. काल संध्याकाळी उशिरा वारखंडे येथील स्मशानभूमीत केतन भाटीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्पदंशानेच मृत्यू; अहवालात नमूद
केतन भाटीकर यांच्या पार्थिवाची चिकित्सा काल मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात करण्यात आली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रो. डॉ. आंद्रे वि. फर्नांडिस (न्यायवैद्यक विभागातील प्रमुख) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शवचिकित्सा केली. केतन भाटीकर यांचा मृत्यू सर्पदंशानेच झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा हा अहवाल जारी करण्यात आला.

15 तारीख अन्‌‍ दुर्दैवी योगायोग
फोंडा मतदारसंघातील तीन प्रमुख राजकीय नेत्यांचे गत 15 महिन्यांच्या कालावधीत आणि 15 तारखेलाच आकस्मिक निधन झाल्याचे दुर्दैवी योगायोग घडला. 15 फेब्रुवारी 2025 रोजी फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2025 रोजी फोंड्याचे तत्कालीन आमदार रवी नाईक यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल म्हणजेच 15 मे 2026 रोजी केतन भाटीकर यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनाक्रम…

डॉ. केतन भाटीकर यांचे मित्र सुशांत कवळेकर यांनी काल या संपूर्ण घटनाक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. केतन भाटीकर हे कामानिमित्त गुरुवारी कर्नाटकातील दांडेली येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर मध्यरात्री ते आणि त्यांचे मित्र सुशांत कवळेकर असे दोघे कारने गोव्यात परतत होते.
अनमोड घाटात केतन भाटीकर यांनी सुशांत कवळेकर यांना आपणाला लघुशंकेसाठी जायचे असून, कार थांबवण्यास सांगितले. त्यावेळी मध्यरात्रीचे 1.30 वाजले होते.

जंगल परिसर व चोहोबाजूंनी असलेला अंधार यामुळे सुशांत कवळेकर यांनी त्यांना तुम्ही येथे उतरू नका. आम्ही जरा पुढे जाऊ. तेथे एक ढाबा आहे, तेथे शौचालयाचीही सोय आहे, असे भाटीकर यांना सांगितले.
मात्र, भाटीकर यांनी आपण मधुमेहाचा रुग्ण असून, आपल्याला त्रास होत आहे, असे सांगून कार थांबवायला लावली. नंतर ते कारमधून खाली उतरले.

लघुशंका करताना भाटीकरांच्या हातातून मोबाईल सुटून झुडपात पडला. तो काढताना त्यांना काहीतरी चावल्याचे जाणवले. कारजवळ येत त्यांनी हाताला कोणीतरी चावल्याचे सांगितले आणि नंतर काही क्षणातच ते खाली कोसळल्याचे सुशांत कवळेकर यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे मोबाईलची रेंजही नव्हती. त्यामुळे काय करायचे ते आपणाला सुचेनासे झाले. त्याच परिस्थितीत आपण वेगाने कार चालवत गोव्याच्या दिशेने आलो. मात्र, या दरम्यान भाटीकर यांची प्रकृती खूपच बिघडली.
भाटीकर यांना पहिल्यांदा पिळये धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते, असे सुशांत कवळेकर यांनी माहिती देताना सांगितले.