इंडिगोच्या निर्णयाचा राज्याच्या पर्यटनाला फटका बसण्याची शक्यता; पर्यटनमंत्र्यांकडून चिंता व्यक्त
अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडण्याबरोबरच हवाई इंधन कधी नव्हे एवढे महाग झाल्याने विमान कंपन्यांनी आता उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फटका गोवा व गोव्याच्या पर्यटनाला बसण्याची भीती निर्माण झालेली आहे. इंडिगो ह्या विमानसेवा कंपनीने 26 जूनपासून दाबोळी व मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील आपल्या उड्डाणांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद यासारख्या मोठ्या शहरांशी संबंधित उड्डाणे कमी करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. तसेच कोलकाता-मोपा मार्गावरील थेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. अन्य काही कंपन्याही आपली उड्डाणे कमी करण्याचा विचार करीत असून, त्याचा फटका मान्सून पर्यटनाला बसण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कित्येक देशांना फटका बसलेला असून, काही देशांत तर लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली असल्याचे रोहन खंवटे यांनी नमूद केले. वरील परिस्थितीचा मोठा फटका पर्यटन राज्य असलेल्या गोव्याला बसण्याची भीती असल्याच्या पार्श्वभूमीवर काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी राज्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांची एक विशेष बैठक घेतली. त्यात राज्यातील हॉटेल व्यावसायिक व हवाई तिकीट एजंट्स यांचा समावेश होता. मध्यपूर्वेतील संघर्ष व त्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन खाते व पर्यटन क्षेत्राशी संबंधीत व्यावसायिकांनी पुढे कसे जायचे, त्यांची भूमिका काय राहील याही परिस्थितीत पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी काय करता येईल यावर सांगोपांग अशी चर्चा करण्यात आल्याची माहिती रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पर्यटन संचालक केदार नाईक हेही या बैठकीला हजर होते.
पुढच्या आठवड्यात 20 मे रोजी आणखी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोहन खंवटे यांनी यावेळी दिली. याशिवाय शॅकमालकांबरोबरही एक बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.