उत्तर प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात 100 जणांचा मृत्यू झाला. तसेच जखमींची संख्या 52 वर पोहचली आहे. राज्यात अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून, घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर 24 तासांच्या आत ही मदत संबधित कुटुंबियांना मिळावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
बुधवारी उत्तर प्रदेशला मुसळधार पावसाने झोडपले. पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पावसाचा सर्वाधिक फटका प्रयागराजला बसला असून, या ठिकाणी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भदोही : 18 मृत्यू, मिर्झापूर : 15 मृत्यू, फतेहपूर : 10 मृत्यू, उन्नाव आणि बदायू : प्रत्येकी 6 मृत्यू, प्रतापगड आणि बरेली : प्रत्येकी 4 मृत्यू, सीतापूर, रायबरेली आणि चंदौली : प्रत्येकी 2 मृत्यू, कानपूर देहात, हरदोई आणि संभलमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, कौशांबी, शाहजहानपूर, सोनभद्र आणि लखीमपूरमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. राज्याच्या विविध भागांमध्ये धुळीचे वादळ दिसू लागले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज आणि पत्र्याचे शेड हवेत उडाले. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. काही भागात घरांची देखील पडझड झाली.
या वादळात 98 घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि 130 पाळीव प्राण्यांचा मृत्यू सुध्दा या भयावह वादळात झाला आहे. झाडे पडणे, भिंती कोसळणे आणि अंगावर वीज पडल्याने बहुतांश मृत्यू झाले आहेत.
हवेत उडाला 50 वर्षीय व्यक्ती
बरेली जिल्ह्यातील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क हवेत उडताना दिसत आहे. बरेलीच्या भमोरा भागातील 50 वर्षीय नन्हे खान यांचा हा व्हिडिओ आहे. एका लग्नासाठी उभारलेल्या तात्पुरत्या शेडचे खांब नन्हे खान यांनी धरून ठेवले होते. मात्र, वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, वाऱ्याने अख्खे पत्र्याचे शेड उखडले आणि त्यासोबत नन्हे खान हेही सुमारे 300 मीटर वर हवेत उडवले आणि नंतर वेगाने जमिनीवर आदळले.