Home Featured ‘आर. जी.’तली आग

‘आर. जी.’तली आग

0

कोणतीही संघटना सुरू करणे सोपे असते, टिकवणे कठीण. गोव्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडविण्याची भाषा करीत स्थापन झालेल्या रेव्हल्युशनरी गोवन्स ह्या राजकीय पक्ष संघटनेच्या समर्थकांना सध्या हा दारूण अनुभव येत असेल. पक्षाची राजकीय आकांक्षा प्रत्यक्षात उतरवणारे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर आणि या पक्षाची संघटनात्मक बांधणी करणारे पक्षप्रमुख मनोज परब या ह्या दोघा खंद्या नेत्यांमध्येच सध्या जुंपली आहे, असे एकूण चित्र आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत गोमंतकीय जनतेच्या आशाआकांक्षा पल्लवित करणाऱ्या ह्या संघटनेत आता उभी फूट पडणार का हा प्रश्न उभा राहिला आहे. गोव्याच्या राजकीय क्षितिजावरील बजबजपुरीला उबगलेल्या तरुणाईला आरजीच्या रूपाने एक आवाज मिळाला. ह्या तरुणाईच्या आशाआकांक्षांना ह्या संघटनेच्या मंचावर वाट मिळाली. प्रस्थापित राजकीय पक्षांकडून मूळ गोमंतकीयांच्या हिताशी प्रतारणा केली जात आहे, ह्या मूलतत्त्वावर ह्या संघटनेची बीजे रोवली गेली. नवी पर्यायी राजकीय व्यवस्था उभी करण्याची बात जशी आम आदमी पक्षाने एकेकाळी केली होती, तशाच प्रकारे पर्यायाची भाषा करीत आर. जी. ने गोमंतकीय युवकांना साद घातली आणि त्याला उत्साही प्रतिसादही मिळाला. कोणत्याही औपचारिक जाहिरातबाजीविना आर. जी. च्या सभांना गावोगावी उदंड प्रतिसाद मिळत गेला आणि बघता बघता हे वारे वादळात रुपांतरित झाले. ‘उजो, उजो’च्या घोषणांनी गोवा दणाणून गेला. 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या नवोदित पक्षाने एक जागा जिंकली तेव्हा तर कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जिल्हा पंचायतीची एक जागाही पक्षाने जिंकली. मूळ गोमंतकीयांचे हित साधू पाहणारी आक्रमक स्थानिक संघटना एवढ्यापुरती ती सीमित उरली नाही. एक राजकीय पक्ष म्हणूनही तिला गांभीर्याने घ्यावे लागेल ही जाणीव त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला झाली. आजवर गोव्याच्या राजकारणाला नावे ठेवत आलेल्या, परंतु त्यापासून दूर राहणाऱ्या तरुणाईला आर. जी. ने एक हक्काचे व्यासपीठ दिले. तिच्या आकांक्षांना स्वप्नांचे पंख दिले. मात्र, सध्या जे काही ह्या संघटनेमध्ये घडत असल्याचे दिसते आहे, ते ह्या साऱ्या आशा आकांक्षांवर, स्वप्नांवर पार विरजण टाकणारे आहे. पक्षाचे प्रमुख आणि पक्षाचे आमदार हेच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकमेकांच्या समर्थकांवर कारवाईची भाषा चालली आहे. आणि सगळ्यांत खेदाची बाब म्हणजे हे सगळे काही अगदी उघडपणे समाजमाध्यमांवर चालले आहे. कोणत्याही संघटनेमध्ये, पक्षामध्ये अंतर्गत मतभेद उद्भवले असतील, तर ते संघटनांतर्गत सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. तसे केल्याने पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला तडा जाणे टळते. मात्र, येथे फेसबुकवर खुलेआम एकमेकांवर चिखलफेक चालली आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे स्वतः पक्षप्रमुख त्यात आघाडीवर आहेत. एकमेकांना अशी समाजमाध्यमांवर आव्हाने देण्याऐवजी ह्या विषयावर पक्षप्रमुख आणि पक्षाचे आमदार ह्यांनी एकत्र येऊन काही समेट, समझोता करणे शक्य नाही काय? काहीजणांवर पक्षविरोधी कारवायांचा आरोप ठेवला गेला आहे. काही पदाधिकाऱ्यांना वारंवार कारवाईचा इशारा देऊनही त्यांनी पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या एवढेच यात पक्षप्रमुखांचे म्हणणे नाही, तर ‘कम्युनल ब्रेनवॉशिंग’चा ठपका त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे आणि हा आरोप अतिशय गंभीर आहे. ह्या आरोपामुळे ह्या वादाला सरळसरळ धार्मिक रंग मिळाला आहे. अशा प्रकारची बेशिस्त कोणी दाखवत असेल तर त्याच्यावर कारवाई होणेही चुकीचे नाही. परंतु त्यासाठी पक्षाचे संघटनात्मक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व यांच्यात एकवाक्यता निर्माण व्हायला हवी. पक्षविरोधी कारवाया केल्या गेल्या हे सिद्ध व्हायला हवे. केवळ पक्षावर आपले वर्चस्व राखण्यासाठी एकमेकांच्या समर्थकांवर पक्षविरोधी कारवायांसाठी कारवाईचे हत्यार उपसले तर जात नाही ना, हेही तपासले गेले पाहिजे. समोरासमोर येण्याची जाहीर आव्हाने देण्यापेक्षा जो काही वाद असेल तो आपसात मिटवावा. पक्षातील आपले वजन महत्त्वाचे की पक्षाचे अस्तित्व महत्त्वाचे ह्याचा विचार आरजीच्या नेतृत्वाने जरूर करावा. कोणत्याही संघटनेला अथवा पक्षाला एक वैचारिक अधिष्ठान लागते. गोव्याची स्वतंत्र अस्मिता, गोमंतकीयांचे हित ह्या अधिष्ठानावर ही संघटना व हा पक्ष उभा आहे असे आम गोमंतकीय मानतो. त्यासाठी तो त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो. विशेषतः गोमंतकीय तरुणाईने मोठा भरवसा तुमच्यावर ठेवला आहे. त्यांचा असा दारूण अपेक्षाभंग करणार आहात का? नेहमी तुमच्या सभांमधून प्रकटणारा ‘उजो’ आता पक्षालाच भस्मसात करणार आहे काय?