पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) उत्तर प्रदेशात छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू असून, या तपासातून हत्येच्या कटाचे संपूर्ण स्वरूप उघडकीस येईल अशी आशा आहे.
कोलकाता आणि अयोध्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राज सिंह नावाच्या व्यक्तीला अटक केली. राज सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी असून तो बिहारच्या बक्सर जिल्ह्यात राहत होता. 6 मे रोजी ही हत्या झाल्यानंतर आरोपी राज सिंह अयोध्येत लपून बसला होता. अटकेनंतर त्याला कोलकाता येथे आणण्यात आले.
बिहारमधील बक्सर येथून
दोन संशयितांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बिहारमधील बक्सर येथून मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर, काल सकाळी मध्यमग्राम पोलीस ठाण्यात त्यांना अटक करण्यात आली.
यूपीआय व्यवहारातून उलगडा
चंद्रनाथ रथ हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिसांना सर्वात मोठा तांत्रिक पुरावा एका यूपीआय पेमेंटमधून मिळाला. तपास यंत्रणांच्या मते, खुनासाठी वापरलेली कार जेव्हा हावडा येथील बाली टोल प्लाझामधून गेली, तेव्हा आरोपींनी फास्टॅग किंवा रोख रकमेऐवजी यूपीआयद्वारे टोल भरला. या डिजिटल व्यवहारामुळे पोलिसांना संशयितांचे मोबाईल नंबर आणि बँक तपशील मिळाले. तांत्रिक मागोवा घेत, तपास त्यांना उत्तर प्रदेश आणि झारखंडपर्यंत घेऊन गेला.