वडोदरा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुन्हा एकदा देशातील नागरिकांना अतिशय मोलाच्या सूचना केल्या. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेलसंकट निर्माण झाले आहे. या तेलसंकटामुळे जगात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे भारताचे परकीय चलन जास्त खर्च होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल यांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात न जाता वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शाळांना ऑनलाईन क्लासेस घेण्याचे आणि देशातील जनतेला पुढील वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले.
नरेंद्र मोदी यांनी कालच्या हैदराबादमधील भाषणानंतर काल गुजरातच्या वडोदरा येथील सरदार धाम वसतिगृहाच्या उद्घाटनावेळी हे आवाहन केले.
माझे देशाच्या प्रत्येक नागरिकाला आवाहन आहे, शक्य होईल तितका पेट्रोल-डिझेलचा उपयोग कमी करा. मेट्रोचा उपयोग करा, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजिनक वाहनांचा वापर जास्त करा. ज्यांच्याकडे कार आहे, त्यांनी एका गाडीत जास्त लोकांना जास्त घेऊन जावे. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहने आहेत त्यांनी दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन मोदींनी केले.
तंत्रज्ञान आज आपल्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांमध्ये व्हर्च्युअल मीटिंग आणि वर्क फ्रॉम होमला प्राथमिकता दिली जावी. मी काही शाळांना देखील आग्रह करेन की, काही कालावधीसाठी ऑनलाईन क्लासेसच्या व्यवस्थेवर काम करावे, असे आवाहन मोदींनी केले.
केवळ इंधनच नाही तर खाद्यतेलावरही देशाचे परकीय चलन खर्च होते. आपण थोडा संयम बाळगला, खाद्य तेलाचा वापर थोडा कमी केला तर यामुळे देश आणि आपल्या आरोग्य दोघांना फायदा होईल, असे मोदी म्हणाले.
इंधन बचतीच्या आवाहनानंतर
हैदराबाद, गुजरातमध्ये रोड शो
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचे आवाहन केले आणि त्यानंतर पुढच्या 24 तासांत तीन मोठे रोड शो देखील केले. पहिल्यांदा रविवारी हैदराबाद आणि त्यानंतर रविवारी आणि सोमवारी गुजरातमध्ये झालेल्या दोन रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्यातील असंख्य वाहनांचा समावेश होता. त्यामुळे इंधन बचतीचा सल्ला फक्त सर्वसामान्यांच का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
15 मेपासून 4 देशांच्या दौऱ्यावर
विदेश दौरे टाळावेत, असे एक आवाहन पंतप्रधान मोदींनी रविवारच्या भाषणातून केले होते. सर्वसामान्यांना विदेश दौरे टाळण्याच्या आवाहनानंतर खुद्द मोदी मात्र 15 मेपासून 4 देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यात नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांच्या दौऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 2021 ते 2025 या काळात मोदींच्या विदेश दौऱ्यावर 462 कोटी खर्च झाले आहेत.
… हे तर मोदींच्या अपयशाचे पुरावे : राहुल गांधी
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर टीका करताना हे सरकारचे अपयश असल्याचे नमूद केले. मोदीजींनी काल जनतेकडून त्याग करण्याची मागणी केली. सोने खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत, त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत. 12 वर्षांत त्यांनी या देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवले आहे की त्यांना जनतेला सांगावे लागते की काय खरेदी करा, काय करू नका, कुठे जा, कुठे जाऊ नका. प्रत्येकवेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी सगळी जबाबदारी जनतेवर टाकून मोकळे होतात. हा देश चालवणं आता तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली.