कारापूर-सर्वण येथील आंदोलक कुळांना आपण त्यांच्या कुळ हक्कांसंबंधीचे दावे मामलेदाराकडे सादर करण्याची सूचना केली असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. कुळांच्या हक्कांवर गदा येऊ दिली जाणार नसल्याचे काल त्यांनी स्पष्ट केले. आंदोलकांची भेट घेऊन आपण त्यांना चर्चेसाठी येण्याचे निमंत्रणही दिले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. एकाही कुळाने आपल्या हक्कासंबंधीचा दावा अद्याप केला नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
कारापूर-सर्वण येथील या जमिनीच्या कुळांची आपल्या हक्कासंबंधीचे दावे मामलेदारांकडे सादर केले तर त्यांना त्यांचे मिळतील व कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी काल स्पष्ट केले. मात्र, या लोकांना आपण कुळ असल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करावे लागणार असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे 22 दिवसांपासून आंदोलन
कारापूर-सर्वण येथील प्रकल्पविरोधात गेल्या 22 दिवसांपासून स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. सदर ठिकाणी एक मोठा लक्झरी टाऊनशीप प्रकल्प उभारण्याचे काम एका परप्रांतीय विकासकाने हाती घेतलेले असून त्याला जोरदार विरोध करीत स्थानिकानी आंदोलन सुरू केले आहे.