Home Featured सत्तांतर होणार?

सत्तांतर होणार?

0

पश्चिम बंगाल आणि तामीळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा अजून बाकी आहे, जो पुढील बुधवारी होईल, परंतु तामीळनाडूचे मतदान एकाच टप्प्यात आटोपले आहे. दोन्ही ठिकाणी विद्यमान सरकारे राहणार की जाणार हा फैसला मतदार करणार आहेत. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यांत सतत सलत आलेली ही दोन्ही सरकारे पायउतार करण्याचा चंग बांधून ह्या निवडणुकीतही अटीतटीची लढत दिली जाताना दिसते, परंतु त्यातून काय निष्पन्न होणार ह्याबाबत साशंकता आहे. भाजपचे विशेष लक्ष आहे ते पश्चिम बंगालवर. डाव्यांची चौतीस वर्षांची सत्ता पायउतार करून तेथे ममता सत्तेवर आल्या. गेली पंधरा वर्षे भाजपने जंग जंग पछाडून पश्चिम बंगालमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले. आपला मताधार अडतीस टक्क्यांपर्यंत वाढवत नेला. त्यामुळे काहीही करून ममतांना चौथ्यांदा सरकार बनवू द्यायचे नाही ह्या निर्धाराने भाजप तेथे यावेळी उतरला आहे. स्वतः पंतप्रधान प्रचारात उतरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री तर बंगालमध्येच ठाण मांडून आहेत. परंतु गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनेही आपला मताधार अठ्ठेचाळीसपर्यंत वाढवला होता आणि तो टिकवण्यासाठी नानाविध कल्याणयोजनांचा धडाका ममतांनी तेथे लावला आहे, मग ती महिलांसाठीची लक्ष्मीर भंडार योजना असो अथवा युवकांसाठीची बांगलार युवासाथी. आपल्या द्वारे राशन आणि द्वारे सरकार म्हणजेच तिथल्या ‘सरकार तुमच्या दारी’च्या जोडीने ‘द्वारे चिकित्सा’ योजना घेऊन ममता आल्या आहेत. भाजपविरोधात ममतांच्या हाती हुकुमी एक्का राहिला आहे तो म्हणजे बंगाली अस्मिता. भाजप हा कसा बाहेरचा पक्ष आहे आणि तो ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत कसा ‘सबका विनाश’ करायला उठलेला आहे, ह्यावर ममतांच्या प्रचाराचा नेहमीच भर राहिला आणि ह्यावेळीही त्या आपल्या बंगाली मतदारांना भाजपपासून दूर ठेवण्यासाठीच ह्याच मुद्द्यावर भर देताना दिसत आहेत. दुसरीकडे, भाजपने मात्र ‘डबल इंजिन’ची ग्वाही देताना तृणमूल सरकारमधील भ्रष्टाचार, राज्यातील गरीबी, बेरोजगारी, उद्योगांचे स्थलांतर आदी मुद्दे ऐरणीवर आणायचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने बंगालमधील मतदानाच्या ऐन तोंडावर आय पॅक प्रकरणात ममतांच्या विरोधात निवाडा देऊन भाजपच्या प्रचाराला जणू ताजा दारूगोळा पुरवला आहे. मोदींच्या प्रतिमेचा प्रभाव आजमावण्याचा प्रयत्न ह्यावेळीही दिसतो. पंतप्रधान मोदी झालमुरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल करून त्या आधारे बंगाली मतदारांची आपुलकी प्राप्त करण्याचा प्रयत्न जोराने केला गेला. तृणमूलपासून अल्पसंख्यकांची मते फोडण्यासाठी हुमायूँ कबीरचा वापर केला जात असल्याचा आरोप त्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून होताना दिसतो. स्वतः गृहमंत्र्यांनी त्या आरोपाचा इन्कार केला असला, तरी काल मतदानावेळी झालेला हिंसाचार तृणमूल आणि कबीर समर्थकांत झाला हे लक्षात घेण्याजोगे आहे. तृणमूलने ह्यावेळी आपली जुनी घोषणा बदलून ‘बोदोल नोय, बदला चाय’ म्हणत बदल्याची भाषा चालवली आहे. तिकडे तामीळनाडूत ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अभाअद्रमुकशी भाजपने पुन्हा गाठ बांधली आहे. 96 च्या विधानसभा निवडणुकीत तामीळनाडूत भाजपचा पहिला आमदार निवडून आला. 2001 साली द्रमुकशी हातमिळवणी करून भाजपने चार आमदार निवडून आणले. पण त्यानंतरच्या निवडणुकांत सव्वादोनशे जागा लढवूनही डिपॉझिटही जप्त होण्याची पाळी आली. मागील निवडणुकीत चार आमदार जिंकले. आता जयललिता आणि करुणानिधींच्या गैरहजेरीत तामीळनाडूत चंचूप्रवेश करण्यास भाजप प्रयत्नशील आहे, परंतु बंगालप्रमाणे येथेही भाजप हा उत्तर भारतीय पक्ष हा शिक्का कायम आहे. भाजप ह्या निवडणुकीत स्वतः सत्तावीस जागा लढवत आहे आणि पक्षचिन्हावर एकूण 33 उमेदवार निवडणूक लढवत असले, तरी येथे त्याची सूत्रे अभाअद्रमुकच्याच हाती आहेत. द्रमुक व अभाअद्रमुक ह्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यावेळी तिसरी शक्ती उभी ठाकली आहे ती आहे विजय याच्या टीव्हीकेची. हा तिसरा पक्ष कोणाची किती मते खेचून घेतो त्यावर तेथील विजय – पराभवाची गणिते ठरणार आहेत. शेवटी दोन्ही राज्यांत सत्ता कोणाच्या हाती येते हे महत्त्वाचे असेल. अँटी इन्कम्बन्सीचा सामना दोन्ही सरकारे करीत आहेत. त्याचा फायदा भाजपला प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या उठवता येणार का, आजवर अप्राप्य राहिलेल्या ह्या राज्यांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करता येणार का हे ही निवडणूक सांगणार आहे. त्यामुळेच संपूर्ण देशाचे त्याकडे लक्ष लागले आहे. ही निवडणूक खरेच इतिहास घडवू शकेल का?