सेंट फ्रान्सिस झेवियरविषयीच्या आक्षेपार्ह विधानाचे राज्यभर पडसाद; वास्को, मडगाव पोलीस स्थानकांवर ख्रिस्ती बांधवांचा मोर्चा
वास्को येथे शनिवारी भगवान परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उजव्या विचारसणीचा नेता, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि यूट्यूबर गौतम खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. या प्रकरणात गौतम खट्टर याच्याविरुद्ध वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 299 आणि 196 कलमान्वये रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला. दुसऱ्या बाजूला राज्यातील ख्रिस्ती बांधव व विरोधी पक्षांनी त्यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला असून, गौतम खट्टर याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. सासष्टी व अन्य ख्रिस्तीबहुल भांगात संतापाची लाट पसरली असून, काल मडगाव व वास्को येथील पोलीस स्थानकांवर ख्रिस्ती बांधवांनी मोर्चा काढत गौतम खट्टर याच्या अटकेची आणि त्याला गोव्यात येण्यास बंदी घालण्याची मागणी केली. दोन्ही ठिकाणच्या पोलीस स्थानकांवर मोठ्या संख्येतील जमावामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आदी पक्षांनी वरील प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी यांनी सदर वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे.
18 एप्रिल रोजी खारेवाडो-वास्को येथील टिळक मैदानावर आयोजित भगवान परशुराम जयंती कार्यक्रमात बोलताना गौतम खट्टर याने आपल्या भाषणाच्या प्रारंभीच सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांविषयी आक्षेपार्ह असे विधान केले होते. तसेच दरवर्षी जुने गोवे येथे होणाऱ्या त्यांच्या फेस्ताला सनातनी लोक का जातात, असा सवालही केला होता. यावेळी दाबोळी मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री माविन गुदिन्हो आणि वास्को मतदारसंघाचे आमदार दाजी साळकर हेही कार्यक्रमाला
उपस्थित होते.
पोलिसांनी नोंदवला एफआयआर
सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे समजताच ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि कुठ्ठाळीचे काँग्रेस नेते पीटर डिसोझा यांनी रविवारी सायंकाळी 4.30 वाजता तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 19 एप्रिल रोजी रात्री 11.18 वाजता एफआयआर नोंदवला.
विविध कलमान्वये गुन्हा नोंद
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 299 आणि 196 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संशयिताने जाणीवपूर्वक आणि विद्वेषपूर्ण भावनेने टिप्पणी करून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पीटर डिसोझा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
वास्को पोलीस स्थानकावर मोर्चा
या कथित अपमानजनक टिप्पणी प्रकरणी गौतम खट्टर याच्या अटकेची मागणी करत वास्को मासे बाजारातील स्थानिक आणि विक्रेते पोलीस ठाण्यासमोर जमले. या टिप्पणीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून जातीय सलोखा बिघडला आहे, असे सांगत मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पुढील तणाव टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगत, गौतम खट्टर याने बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही केली. तसेच आयोजन समितीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तथापि आंदोलकांच्या मागण्यांवर पोलिसांनी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
मडगावातही उमटले पडसाद
गौतम खट्टर याने आपल्या भाषणात सेंट फ्रान्सिस झेवियरसंबंधी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने ख्रिस्ती समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, काल दक्षिण गोव्याच्या विविध पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात नागरिकांनी निषेध
मोर्चा नेला व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेऊन गौतम खट्टर याला अटक करण्याची मागणी केली. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा मडगाव पोलीस स्थानकावर नेला.
एल्टन डिकॉस्टा काय म्हणाले?
आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी गौतम खट्टर याच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचे कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली
आम आदमी पक्षाकडून निषेध
सेंट फ्रान्सस झेवियर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह असे उद्गार काढणाऱ्या गौतम खट्टर याचा काल आम आदमी पक्षाने निषेध केला. तसेच आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांच्या अध्यक्षतेखालील एका शिष्टमंडळाने काल दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेऊन गौतम खट्टर यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली.
लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न
गोव्यात विविध धर्मांचे लोक राहत असून ते गुण्यागोविंदाने राहत असून, ते विविध धर्मांचे असले तरी ते स्वत:ला प्रथम गोमंतकीय मानतात. राज्यात सध्या गोवा सरकारविरोधात जी आंदोलने चालू आहेत तेथून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच जाणूनबुजून हे घडवून आणले असल्याचा आरोप यावेळी वाल्मिकी नाईक यांनी केला.
गुदिन्हो यांनी राजीनामा द्यावा
या विषयावर सत्ताधारी भाजप का गप्प आहे? खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरुद्ध जे आक्षेपार्ह विधान केले आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे का, असा सवाल करतानाच मंत्री माविन गुदिन्हो व अन्य भाजप आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही आम आदमी पक्षाने केली.
माविन गुदिन्हो 24 तास
का गप्प बसले? : पाटकर
पणजी (प्रतिनिधी) : वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी वास्को येथील एका कार्यक्रमात गौतम खट्टर याला सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना का रोखले नाही, असा प्रश्न गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस मुख्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलताना काल उपस्थित केला. काँग्रेसच्या कुठ्ठाळी गटाध्यक्षांनी या आक्षेपार्ह विधानाबाबत वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. गौतम खट्टर याला तातडीने अटक करावी. माविन गुदिन्हो या घटनेबाबत 24 तास गप्प बसले होते, तर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर 48 तास गप्प का बसले. आता, त्यांची तोंडे उघडली आहेत, अशी टीका अमित पाटकर यांनी केली.
मंत्री माविन गुदिन्हो टीकेचे धनी
दरम्यान, वास्कोतील सदर कार्यक्रमाला मंत्री माविन गुदिन्हो हे हजर असताना त्यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाला विरोध का केला नाही, असा प्रश्न ख्रिस्तीबांधव उपस्थित करू लागले असून, त्यांच्या या गप्प राहण्याच्या कृतीबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
सोशल मीडियावरही संताप
वास्कोतील कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी गौतम खट्टर याने आक्षेपार्ह व अपमानकारक असे उद्गार काढल्याचे वृत्त नंतर वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले आणि एकच खळबळ माजली. विशेष करून ख्रिस्तीबहुल सासष्टी तालुक्यात त्याचे मोठे पडसाद उमटले आणि सोशल मीडियावरून त्यासंबंधीचे पोस्ट व्हायरल होऊन चर्चेला उधाण आले. गोव्यातील धार्मिक सलोख्याला तडा देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे सांगत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीने या विधानाचा निषेध केला.
‘त्या’ घटनेची आठवण
2024 साली ऑक्टोबर महिन्यात सुभाष वेलिंगकर यांनी देखील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्यानंतर गोव्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांच्या अटकेसाठी राज्यातील ख्रिस्तीधर्मियांनी दोन दिवस आंदोलन केले होते. वेलिंगकर यांनी त्यावेळी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केल्याने वाद उफाळला होता. आता 18 महिन्यानंतर पुन्हा एकदा तशीच घटना घडल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आतापर्यंत 6 तक्रारी दाखल
सेंट फ्रान्सिस झेव्हियरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याच्याविरोधात आत्तापर्यंत 6 तक्रारी प्राप्त झाल्या असून, या प्रकरणात वास्को येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गौतम खट्टर यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक गुरुदास कदम यांनी काल दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वी गौतम खट्टर हा गोव्यातून परराज्यात गेल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या पथके रवाना केली जातील, असेही कदम यांनी सांगितले.
आयोजकांकडून खेद व्यक्त
दुसरीकडे, वास्को येथील परशुराम जयंती उत्सवाच्या आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वापरलेले शब्द दुर्दैवी असून, वक्त्याने तसे विधान करताच त्याला तातडीने थांबवण्यात आले होते, असा दावा आयोजकांनी केला आहे. या घटनेबद्दल खेद व्यक्त करत ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची आयोजकांनी माफी मागितली आहे. मात्र, तरीही गोव्यातील विविध राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे.
आयोजकांनी काळजी घ्यायला हवी : मुख्यमंत्री
अशा कार्यक्रमात गोव्याबाहेरील व्यक्तींना निमंत्रित केल्यानंतर ते व्यासपीठावरून कोणतेही अनुचित उद्गार काढणार नाहीत याची काळजी आयोजकानी घ्यायला हवी. ती त्यांची जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. कार्यक्रमाला हजर असलेले मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी गौतम खट्टर हा सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह असे विधान करीत असताना त्याला रोखायला हवे होते; पण अशा वेळी एकदम ते सूचतेच असे नाही, अशी पुस्तीही एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जोडली. सध्या सुरू असलेल्या चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
आलेमाव यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेऊन सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याला तातडीने अटक करण्याची मागणी केली. यावेळी खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्टा, सुनील कवठणकर, अमित पालेकर व इतरांची उपस्थिती होती. या प्रकरणात मंत्री मावीन गुदिन्हो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना केली.