Home Featured पुन्हा चर्चा

पुन्हा चर्चा

0

कोणताही समझोता तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा दोन्ही पक्षांची तडजोडीची तयारी असते. अमेरिका आणि इराण ह्या दोन्ही देशांचा एकूण पवित्रा पाहिला, तर मात्र तडजोडीच्या तयारीपेक्षा संघर्षाची खुमखुमीच अधिक दिसते. दोन्ही पक्ष आपली हार मानायला तयार नाहीत आणि उभयपक्षी सामोपचाराने युद्ध संपविण्याऐवजी समझोता करणार नसाल तर पुन्हा बॉम्बवर्षाव करण्याच्या धमक्या देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दांडगाई आणि हडेलहप्पीवर उतरलेले दिसत असल्याने ह्या चर्चेची फलनिष्पत्ती काय होणार ह्याबाबत मोठी साशंकता आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने उभय देशांदरम्यान चर्चेची बोलणी गेल्या आठवड्यात इस्लामाबादेत झाली. मात्र, त्या चर्चेची सुरूवातच परस्परांविषयीच्या पराकोटीच्या अविश्वासाच्या भुसभुशीत पायावर झाल्याने त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. इराण आपल्या अटींवर ठाम राहिला. अमेरिका – इराण दरम्यान पाकिस्तानाच चर्चा सुरू असताना इस्रायलने लेबनॉनमधील हिज्बुल्ला ह्या इराणच्या हस्तकांवर हल्ले सुरूच ठेवल्याने मुख्यत्वे ही चर्चा फिसकटली. त्यामुळे शेवटी अमेरिकेला इस्रायलचे कान पिळावे लागले. इस्रायलला लेबनॉनवर हल्ला करण्यास अमेरिकेने ‘मज्जाव’ केला असल्याची जाहीर शेखी डोनाल्ड ट्रम्प यांनी मिरवली आहे. इस्रायल आणि लेबनॉनदरम्यान शांततापूर्ण बोलणी घडवून आणण्यात अमेरिकेने यश मिळवले, त्यामुळे पुन्हा एकदा आशेचा किरण लकाकला. इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत ही इराणने घातलेल्या अटीची पूर्तता होताच इराणनेही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करीत असल्याचे घोषित केले. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणदरम्यान चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता वाढली आहे. सोमवारी पाकिस्तानात पुन्हा नव्याने ही चर्चेची दुसरी फेरी होण्याचे सूतोवाच झाल्याने पुन्हा एकवार समझोत्याची आशा जागली आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान कळीचा मुद्दा आहे तो इराणच्या आण्विक क्षमतेचा. काहीही करून इराणच्या ताब्यातील युरेनियम त्यांच्याकडून हिरावून घेण्याचा चंग अमेरिकेने बांधला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने इराणच्या सर्व आण्विक ठिकाणांवर बारा दिवस हल्ले चढवून त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इराणचे सर्व अणुप्रकल्प हे भूमिगत असल्याने त्याचा तेवढा फायदा झाला नाही. त्यामुळे ह्यावेळी अमेरिकेने आपले बंकर बस्टर बॉम्ब टाकून त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना किती यश आले आणि किती नाही हे स्पष्ट नाही. परंतु इराणपाशी अजूनही युरेनियम आहे ही बाब ट्रम्प यांना सलते आहे. चीन आणि रशियाच्या मदतीने इराण कधीही अण्वस्त्रे बनवू शकतो ही भीती अमेरिकेला आहे. युक्रेनला अमेरिका देत असलेल्या पाठबळाचा वचपा रशिया इराणला पाठबळ देऊन काढील हे ट्रम्प जाणून आहेत. त्यामुळेच इराणची आण्विक क्षमता नेस्तनाबूत करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. होर्मुझचा मुद्दा नंतर पुढे आला. हे युद्ध सुरू झाले तेव्हा तो मुद्दाच नव्हता. होर्मुझवर इराणनने निर्बंध घालताच इराणच्या बंदरांची नाकेबंदी अमेरिकेच्या नौदलाने केली आहे. मात्र, आता होर्मुझ खुली करण्यास इराण राजी झाला आहे, परंतु त्यातून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांनी आपली परवानगी घ्यायला हवी व आपल्याला शुल्क द्यायला हवे ह्या मागणीवर इराण अद्याप ठाम आहे. त्यामुळे होर्मुझच्या स्वामित्वाच्या मुद्द्यावर वाटाघाटी होऊ शकतात. इराणवरील निर्बंधांवेळी अमेरिकेने त्या देशाची देशाबाहेरील संपत्ती व निधी गोठवला. तो मोकळा करण्यासाठी ह्या वाटाघाटींचा वापर इराण करू पाहील. त्यामुळे हे जे मुद्दे आहेत, त्यावर दोन्ही पक्षांदरम्यान चर्चा होऊ शकते आणि त्याच्या आधारे हा संघर्ष बोथट करता येण्यासारखा आहे. मात्र, अमेरिकेचे नेतृत्व सध्या एका लहरी आणि अविचारी नेत्याच्या हाती आहे हे येथे विसरून चालणार नाही आणि सामोपचाराच्या बोलण्यांतील सर्वांत मोठा अडथळा खरे तर हाच आहे. जागतिक महासत्ता असल्याची मुजोरी आणि वसाहतवादी मानसिकता आणि त्यात असे लहरी नेतृत्व यामुळे ही बोलणी एका समान पातळीवर होत नाहीत ही ह्या चर्चेची सर्वांत मोठी मर्यादा आहे. एका तासात सात खोटे दावे ट्रम्प यांनी केल्याची जहरी टीका इराणने केली त्यातच ही चर्चा किती डळमळीत पायावर होते आहे हे लक्षात येते. पाकिस्तानची भूमिका ह्यात केवळ पोस्टमनची आहे. दोन्ही देशांवर दबाव टाकून त्यांना समझोत्यासाठी समान पातळीवर आणण्याची पाकिस्तानची कुवत नाही. त्यामुळे युद्ध लांबण्याचे दुष्परिणाम डोळ्यांसमोर ठेवूनच दोन्ही देशांनी ह्या चर्चेकडे सकारात्मकतेने पाहिले, तरच काही तोडगा निघू शकेल आणि युद्ध आटोपते घेता येऊ शकेल. अन्यथा पुन्हा भडका उडणे अनिवार्य असेल.