Home अंगण पुस्तक हेचि गुरु, ज्ञानाचे महामेरु!

पुस्तक हेचि गुरु, ज्ञानाचे महामेरु!

0
  • अरुण जयराम कामत

पुस्तके ही माणसाची खरी मित्र असतात असे म्हटले जाते. पुस्तके कधीही आपल्याला एकटे पडू देत नाहीत. ती आपल्याला ज्ञान देतात, प्रेरणा देतात आणि विचार करण्याची क्षमता वाढवतात. चांगली पुस्तके वाचल्याने सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते. वाचनामुळे नवीन कल्पना सुचतात आणि सर्जनशीलता वाढते. पुस्तक वाचनामुळे भाषा अधिक समृद्ध होते आणि लेखन कौशल्य सुधारते. माणसाच्या विचारांची दारे उघडणारी, बुद्धिमत्तेला पैलू पाडणारी आणि आयुष्य समृद्ध करण्याची क्षमता पुस्तकांत असते. पुस्तकांच्या महत्तेची जाणीव सामान्यांना करून देण्यासाठी दरवर्षी 23 एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने…

पोटापाण्याचा व्यवसाय तुम्हाला जगवेल पण संगीत, नृत्य, क्रीडा, नाटक, साहित्य यांतील एखाद्या कलेशी असलेली तुमची मैत्री कशासाठी जगायचे हे तुम्हाला सांगून जाईल. महाराष्ट्राचे- नव्हे तर अवघ्या मराठी रसिकांचे- लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे हे उद्गार आहेत. आपण सगळेजण पोटासाठी, अर्थार्जनासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतो, पण माणसाला आत्मिक समाधान लाभते ते कलेच्या माध्यमातून. या वर नमूद केलेल्या कलाक्षेत्रातील एक क्षेत्र म्हणजे अक्षर वाङ्मयातून निर्माण झालेले साहित्य. उत्तम साहित्य वाचकाला आनंद तर देतेच, पण त्याचबरोबर ज्ञानाचेही ते प्रमुख स्रोत ठरते.

महाभारत-रामायण हे भारतीय आध्यात्मिक साहित्यातील आद्य ग्रंथ. जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी ही ग्रंथनिर्मिती झाली, पण आजही भारतीय समाजमनावर या महाकाव्यांचे गारुड राज्य करून आहे. महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या ‘रामायण’ महाकाव्यात 24,000 श्लोक आहेत. अयोध्येचा राजकुमार श्रीराम, त्याची पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांचा 14 वर्षांचा वनवास, रावणाकडून सीतेचे अपहरण आणि रामाकडून रावणाचा वध ही मुख्य कथा आहे. दशानन रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाचे कर्तृत्वगान असलेले महाकाव्य ‘रामायण’ हे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राजा आणि आदर्श बंधू (भरत-लक्ष्मण) यांचे उदाहरण ठरते. महर्षी व्यास यांनी रचलेले ‘महाभारत’ महाकाव्य हे मानवी जीवनातील सर्व सद्गुण- दुर्गणांचे दर्शन घडविणारा ग्रंथ आहे. हस्तिनापूरच्या कुरू वंशातील कौरव आणि पांडव यांच्यातील राज्य व अधिकारासाठीच्या संघर्षाची ही कथा आहे. या दोन्ही महाकाव्यांचा सार म्हणजे धर्माचा अधर्मावरील विजय. मानवी जीवन आणि नीतिमत्तेचे त्यातील स्थान याचे ‘महाभारत’-‘रामायण’ महाकाव्यांमधून दर्शन होते. या अजरामर साहित्यातून गेली शेकडो वर्षे भारतीय जनमानसावर कळत-नकळत सुसंस्कार घडत गेले. ग्रंथांची- साहित्याची ही किमया आहे. पोटापाण्याच्या मागे धावणाऱ्या माणसाला मनःशांती मिळवून देण्याची ताकद या ग्रंथांत आहे.

माणसाच्या विचारांची दारे उघडणारी, बुद्धिमत्तेला पैलू पाडणारी आणि आयुष्य समृद्ध करण्याची क्षमता पुस्तकांत असते. पुस्तकांच्या महत्तेची जाणीव सामान्यांना करून देण्यासाठी दरवर्षी 23 एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ (वर्ल्ड बुक डे) साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण जगभर वाचन, लेखन, प्रकाशन आणि बौद्धिक स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हा दिवस विल्यम शेक्सपियर आणि मिगेल दे सर्वांतेस या दोन थोर साहित्यिकांच्या निर्वाणाचाही दिवस आहे. ‘पुस्तक दिन’ साजरा करण्याची कल्पना 1922 साली विन्सेंट क्लेवल या स्पॅनिश माणसाने रोवली. बार्सेलोनास्थित सर्वेंटीस पुस्तक प्रकाशन संस्थेचे संचालक असलेल्या विन्सेंट यांनी आपल्या संस्थेचे लेखक असलेल्या मिंगेल सर्वेंटीस यांच्या पुस्तकांची विक्री वाढविण्यासाठी 7 ऑक्टोबर 1926 हा दिवस पुस्तक दिन म्हणून जाहीर केला. पुढे 23 एप्रिल 1930 रोजी मिंगेल यांचे निधन झाले, त्यानंतर 23 एप्रिल हा दिवस त्या भागात ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. योगायोगाने स्थानिक कंटोलेनिया भागाचे सेंट जॉर्ज यांचाही हा जयंती दिन आहे. त्यामुळे या दिवशी त्या भागात उत्साही वातावरण असे, ज्याचा लाभ पुस्तकविक्रीसही होत होता.
1995 सालापासून संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘युनेस्को’तर्फे 23 एप्रिल हा दिवस ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. या तारखेचे विशेष महत्त्व आहे. जगातील अनेक महान लेखकांचे जन्म किंवा निधन या दिवशी झाले आहेत. त्यात विल्यम शेक्सपिअर, मिगेल दे सर्व्हांटीस आणि इन्का गार्सिलासो दे ला वेगा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या महान साहित्यिकांनी साहित्यक्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला.
इंग्रजीत ‘बुक्स आर मॅन्स बेस्ट फ्रेंडस्‌‍’ असे म्हणले जाते हे शंभर टक्के खरे आहे. पुस्तके ही माणसाची खरी मित्र असतात असे म्हटले जाते. कारण पुस्तके कधीही आपल्याला एकटे पडू देत नाहीत. ती आपल्याला ज्ञान देतात, प्रेरणा देतात आणि विचार करण्याची क्षमता वाढवतात. नाना विषयांवरील ग्रंथ वाचण्याचे अनेक फायदे आहेत. वाचनामुळे व्यक्तीचा विचार विस्तारतो. चांगली पुस्तके वाचल्याने सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते. अनेक यशस्वी व्यक्तींनी वाचनाला त्यांच्या यशाचे गुपित मानले आहे.
कादंबऱ्या, कथा आणि साहित्य वाचल्याने कल्पनाशक्ती विकसित होते. वाचनामुळे नवीन कल्पना सुचतात आणि सर्जनशीलता वाढते. हे विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहे.
पुस्तक वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो. भाषा अधिक समृद्ध होते आणि लेखन कौशल्य सुधारते. त्यामुळे सर्जनशील लेखकांसाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे ठरते. जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागे युनेस्कोची अनेक महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे वाचनसंस्कृती वाढवणे, लेखकांचा सन्मान करणे, प्रकाशन उद्योगाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे होय. हा दिवस लोकांना पुस्तकांकडे आकर्षित करतो आणि वाचनाचे महत्त्व पटवून देतो.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वाचन प्रचंड होते. स्वातंत्र्यलढ्यावेळी आपल्या व्यस्त कार्यक्रमातही ते वाचनासाठी वेळ देत असत. अहमदनगर येथील तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेले ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक आणि त्यातील अनेकाविध संदर्भ म्हणजे नेहरूंच्या व्यासंगाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. पंतप्रधानपदी असताना पंडितजी एकदा लंडन दौऱ्यावर होते. कॉमनवेल्थ परिषदेची अत्यंत महत्त्वाची बैठक असतानाही नेहरूंनी सकाळी ऑक्सफर्ड स्ट्रीटवरील पुस्तक दुकानात जाऊन पुस्तके खरेदी केली.

महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक राहिलेले स्व. गोविंदराव तळवलकर हे विचक्षण वाचक होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक असताना तळवलकर यांनी ‘वाचता वाचता’ हे सदर ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिले. या सदरातून ते त्यांच्या वाचनात आलेल्या अनेक पुस्तकांचा, विषयांचा आणि त्याबरोबरीने जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय वाचकांना करून देत. ते लेख पुढे ‘वाचता वाचता’ या नावाच्या संग्रहातून प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे वाचकांसाठी मेजवानी ठरते. या पुस्तकातून मराठी वाचकांसाठी इंग्रजी साहित्याचे नवे दालनच गोविंदरावांनी खुले करून दिले आहे. या पुस्तकात निवडक 91 लेख आहेत. जगभरच्या राजकीय व वैचारिक विश्वाबरोबरच इतिहास, निसर्ग, ललित व साहित्यिक विश्व आदी विविध विषयांवरील लेख त्यात आहेत. आज इंटरनेटच्या माध्यमातून आपण जागतिक दर्जाचे कोणत्याही भाषेतील साहित्य वाचू शकतो. सुलभ तंत्रज्ञानाने पट्दिशी हवी ती माहिती आपल्याला मोबाईलद्वारे तळहातावर उपलब्ध होते. चारपाच दशकांपूर्वी मात्र अशी कोणतीच सोय नव्हती. इंग्रजी किंवा अन्य परकीय भाषांतील महत्त्वाची पुस्तके भारतात उपलब्ध होणे मोठे दुर्मीळ होते. पण वाचनप्रेमी असलेल्या गोविंदरावांनी ही पुस्तके देश-विदेशाच्या प्रवासात आपल्या विविध मित्रांकडून किंवा तेथील ग्रंथालयांतून मिळवून वा परदेशातून स्वतः विकत घेऊन, देशातील ब्रिटिश लायब्ररी, एशियाटिक सोसायटी यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून मिळवून आपला वाचनाचा व्यासंग जपून ठेवला होता. या त्यांच्या वाचनाचा परिपाक म्हणजे त्यांचे हे लेख आहेत. त्यातून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य वाचकाच्या ज्ञानात मात्र प्रचंड भर पडते.
दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘युनेस्को’ जगातील एका शहराची जागतिक पुस्तक राजधानी शहर म्हणून निवड करते. या शहराला एका वर्षासाठी विशेष दर्जा दिला जातो. त्या कालावधीत हे शहर वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करते. पुस्तक राजधानी निवडताना काही निकष विचारात घेतले जातात. त्यांत प्रामुख्याने त्या शहरातील प्रशासनाने वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, शहरातील ग्रंथालय व्यवस्था, तेथील प्रकाशन उद्योग, शहरात होणारे साहित्यिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, डिजिटल वाचन प्रोत्साहन अशा बाबींचा विचार केला जातो. पुस्तक राजधानी घोषित झाल्यानंतर त्या शहरात वर्षभर वाचन कार्यक्रम होतात. नवीन ग्रंथालये उभारली जातात आणि जुन्यांचे आधुनिकीकरण त्यानिमित्ताने होते. पुस्तक राजधानी निवडलेल्या शहरातील स्थानिक साहित्यिकांना जागतिक व्यासपीठ मिळते. त्या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते आणि साहित्यिक पर्यटन वाढते. सांस्कृतिक विकास होऊन शहराची सांस्कृतिक ओळख मजबूत होते.
जागतिक पुस्तक राजधानी उपक्रमाची सुरुवात 2001 साली झाली. या निवडीची शिफारस ‘युनेस्को’च्या जागतिक पुस्तक राजधानी सल्लागार समितीने केली होती. या समितीत इंटरनॅशनल पब्लिशर्स असोसिएशन, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, इंटरनॅशनल ऑथर्स फोरम या जागतिक संस्थांचा समावेश असतो. पहिल्या जागतिक पुस्तक राजधानीचा मान स्पेनमधील माद्रिद या शहराला देण्यात आला. 2002 साली इजिप्तमधील लेक्सेंड्रीया तर 2003 साली हा जागतिक मान आपली राजधानी नवी दिल्ली या शहराला लाभला. 2025 साली ब्राझिल येथील रीओ दी जेनेरीओ शहर जागतिक पुस्तक राजधानीसाठी निवडले गेले होते. ‘युनेस्को’ने मोरोक्कोची राजधानी रबत शहराची 2026 साठी ‘जागतिक पुस्तक राजधानी’ म्हणून निवड केली आहे. ही निवड करण्यामागे अनेक महत्त्वाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. रबत हे शहर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ‘आंतरराष्ट्रीय प्रकाशन आणि पुस्तक मेळाव्याचे’ आयोजन करते. रबतमध्ये 54 पेक्षा जास्त प्रकाशन संस्था कार्यरत आहेत. शहराच्या मजबूत साहित्यिक वारशाचे ते एक प्रतीक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, वाचनाच्या माध्यमातून महिला आणि तरुणांना सक्षम करण्यासाठी रबतने विशेष उपक्रम राबवले आहेत आणि उपेक्षित समुदायातील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हाती घेतले आहेत.

बालवयात हाती आलेल्या मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र ‘श्यामची आई’ या पुस्तकाने मला वाचनाची गोडी लावली. पुढे हे वाचनप्रेम आणि वेड वाढतच गेले. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुस्तकांनी अजोड साथ दिली. वाचलेल्या कादंबऱ्यांनी मनुष्य स्वभावाचे कंगोरे दाखवून दिले तर कवितांनी डोळ्यात कधी आसू तर कधी हसू फुलविले. चरित्र-आत्मचरित्रांमधून कठीण प्रसंगी जगण्याचे बळ प्राप्त झाले, तर प्रवासवर्णनामधून जगभ्रमंतीही झाली. ललित लेखसंग्रहांनी नवीन विचारांचे बीजारोपण केले तर विविध कोश वाङ्मयाने ज्ञानात भर घातली. आपल्याला बौद्धिकदृष्ट्या श्रीमंत करणाऱ्या पुस्तकांचे हे ऋण मलाच नव्हे तर कोणत्याही वाचकाला कधीच फेडता येणारे नाही. अर्थात कोणताही वाचक या ऋणात राहण्यासही पसंत करेल. जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकप्रेमींना खूप खूप शुभेच्छा!