नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याने टीका
विरोधी पक्षांचाही मुख्यमंत्र्यांकडून निषेध
संसद तसेच राज्य विधानसभा यांत महिलांना 33 टक्के एवढे आरक्षण देण्यासंबंधीचे नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला काँग्रेस पक्षाने पक्षाने विरोध केल्याचा आरोप करून काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसचा राष्ट्रविरोधी व महिला विरोधी असा उल्लेख केला. नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून काँग्रेसने महिलांचा विश्वासघात केल्याचाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे बोलताना आरोप केला.
संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संमत होऊ शकले नाही त्याला काँग्रेसच जबाबदार असल्याचे सांगून मुक्मयंत्री डॉ. सावंत यांनी, संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश एवढ्या बहुमताची गरज होती. मात्र, काँग्रेस पक्षाने या विधेयकाला विरोध केल्याने तेवढे बहुमत मिळू शकले नाही. परिणामी महिला आरक्षण विधेयक संसदेत संमत होऊ शकले नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महिला आरक्षणासाठीची आपली बांधिलकी काँग्रेस पक्ष विसरल्याचा आरोप त्यांनी यावेळी पुढे बोलताना केला. संसदेत हे महिला आरक्षण विधेयक पारीत झाले असते तर देशात महिला सबलीकरणाचे काम नेटाने गतीमान झाले असते, असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाने देशाला एक महिला पंतप्रधान दिली. मात्र, महिलांचा कधीही आदर केला नाही. महिलांचा वापर फक्त मतांसाठी केला आणि शेवटी महिला आरक्षण विधेयकालाही विरोध केला असा आरोपही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकार परिषदेतून केला.
इंडिया आघाडीचा निषेध
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाबरोबरच त्यांचे सहकारी पक्ष असलेल्या इंडिया अलायन्सचाही आपण निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. भाजपचे डबल इंजिन सरकार तसेच महिलांच्यावतीने त्यांचा निषेध करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
महिलांचा विश्वासघात
महिला आरक्षण विधेयक विरोध करून काँग्रेस पक्षाने देशातील 70 कोटी महिलांच्या विश्वासघात केला असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सबलीकरणासाठी विविध पावले उचलल्याचा दावा केला.
यावेळी बोलताना प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी काँग्रेसवर टीका करताना, महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून काँग्रेस पक्षाने महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
आमदार डॉ. राणेंचीही टीका
आमदार डॉ. दिव्या राणे यांनीही काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केला. त्या म्हणाल्या की, आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत पण असे असतानाही त्यांना कायदा निर्मिती प्रक्रियेत भाग घेता येत नाही. महिला आरक्षण लागू झाले असते तर त्यांना त्यात भाग घेण्याची संधी मिळाली असती.
पालिका निवडणुकांबाबत
माहिती नाही ः मुख्यमंत्री
राज्यातील नगरपालिका निवडणुका या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी होतील की नंतर हे आपण सांगू शकत नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. त्यासंबंधीचे अधिकार हे राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीसंबंधीची घोषणा करण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे ते म्हणाले.
सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार प्रभाग फेररचना ही आता मतदारांपेक्षा त्या प्रभागांतील एकूण लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अन्य राज्यांतही याच पद्धतीने प्रभागांची फेररचना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
निवडणुकीसंबंधीचा निर्णय घेऊन तशी घोषणा करण्याचा अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाला आहे. निवडणुकीसंबंधीचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार सरकारने राज्य निवडणूक आयोगाला दिला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.