Home Featured शिक्षा होईल हे पाहा!

शिक्षा होईल हे पाहा!

0

गतवर्षी गोव्याला हादरवून सोडणाऱ्या म्हापसा व दोनापावला येथील दरोड्यांप्रकरणी एका बड्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळण्यात अखेर गोवा पोलिसांना यश आले. दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्यांनी दिल्लीतून ह्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. एवढ्या उशिराने का होईना, परंतु ज्या चिकाटीने आणि निर्धाराने पोलिसांनी ह्या दरोड्यांचे प्रकरण धसास लावले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अर्थात, ह्या तपासाची केवळ पहिली पायरी अद्याप गाठली गेली आहे. ह्या गुन्हेगारांकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करणे, ह्या टोळीशी अन्य कोणाकोणाचे लागेबांधे आहेत ह्याचा शोध घेणे आणि प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना त्यांच्या कृत्याची कठोरातील कठोर सजा मिळवून देणे हे काम अजून बाकी आहे. ह्या प्रकरणात सर्वांत चिंताजनक बाब समोर आलेली आहे ती म्हणजे अत्यंत सराईतपणे आणि सहजतेने हे गुन्हेगार भारतातून बांगलादेशात आणि बांगलादेशातून भारतात ये – जा करायचे. त्यासाठी अशा प्रकारच्या मानवी तस्करीत सहाय्य करणाऱ्या मध्यस्थांची मदत त्यांना व्हायची. भारत – बांगलादेश ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. परंतु तरीही ती एवढ्या सहजतेने जर पार करता येत असेल, त्यासाठी मदत करणारे मध्यस्थांचे जाळे अस्तित्वात असेल, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ती अतिशय चिंताजनक बाब आहे. ज्या मार्गाने हे दरोडेखोर ये – जा करू शकले, त्याच मार्गाने कुख्यात दहशतवादीही ये – जा करू शकतील त्याचे काय? त्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीने आणि सर्व राज्यांच्या पोलीस यंत्रणांच्या समन्वयाने विशेष तपास पथकाद्वारे ह्या प्रकरणाचे सर्व बारीक सारीक धागेदोरे शोधून काढले जाणे गरजेचे आहे. कर्नाटकपासून ओडिशापर्यंत अनेक राज्यांतील किमान चौदा दरोड्यांमध्ये ह्या टोळीचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शी तपासात आढळून आलेले आहे. ही टोळी सशस्त्र असे आणि त्यांनी त्यांना पकडायला गेलेल्या पोलिसांवर गोळीबारही केला. घरात कोणी नसताना दरोडे टाकणारी ही टोळी नव्हती, तर माणसे घरात असतानाच पहाटे घरात प्रवेश करून त्यांना प्रचंड मारहाण करून बांधून घालून प्रचंड दहशत निर्माण करायची आणि अगदी आरामात लूट करायची त्यांची कार्यपद्धती होती. किंचितसा प्रतिकार करणाऱ्यांचा खून पाडण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. गोव्यातील दरोड्यांमध्ये तर त्यांनी छोट्या मुलीपासून वयोवृद्ध महिलेपर्यंत कोणालाही निर्दयी मारहाण करण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. ह्यापैकी एका दरोड्यात तर तीव्र मानसिक धक्क्याने प्रकृती खालावल्याने वयोज्येष्ठ महिलेचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यामुळे ह्या दरोडेखोरांबाबत यत्किंचितही दयामाया दाखवली जाऊ नये. पोलिसांनी ह्यांचा माज उतरवायलाच हवा. दरोडे टाकायचे, पळ काढायचा, आंतरराष्ट्रीय सीमा पार करून बांगलादेशात पसार व्हायचे असे ह्यांचे तंत्र होते. परंतु अशा तंत्रावर मात करणारे प्रगत तंत्रज्ञान सुदैवाने आज उपलब्ध आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल मॉनिटरिंग, बायोमॅट्रिक्स व इतर डेटा, समाजमाध्यमांवरील रिअल टाइम अपडेट आणि अन्य अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून अशा गुन्हेगारांचा माग काढणे शक्य असते. पोलिसांनी ह्या प्रकरणात ह्या सगळ्याचा वापर केला म्हणून गुन्हेगार सापडू शकले. एकीकडे ही टोळी सापडली असतानाच दुसरीकडे कदंब पठारावरील एका बंगल्यावर दरोडा पडला आहे. म्हणजे अशा सराईत टोळ्या अजूनही आहेत. डिचोलीत नुकतीच एक घरफोडी करणारी टोळी पकडली गेली. तिचेही बांगलादेशशी लागेबांधे दिसतात. गोवा ही ह्या चोरा, दरोडेखोरांसाठी दुबई झालेली आहे. पूर्वी गणेश चतुर्थीच्या सुमारास बंद घरे पाहून चोऱ्या व्हायच्या. आता तिन्ही त्रिकाळ घरफोड्या, दरोडे चाललेले दिसतात. गोव्यात मुख्यतः बांधकाम आणि इतर नानाविध व्यवसायांच्या निमित्ताने, सुरक्षारक्षक, डिलीव्हरी एजंट वगैरे म्हणून अक्षरशः हजारो परप्रांतीयांचे लोंढे घुसले आहेत. ह्या लोकांना भाड्याने राहू देणाऱ्यांकडून त्यांची माहिती पोलिसांना दिली जात नाही. त्याबाबत बेजबाबदार घरमालकांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ह्या परप्रांतीयांच्या सुळसुळाटावर देखरेख ठेवली गेली पाहिजे. पर्यटनाच्या बहाण्याने येणाऱ्या टोळक्यांची हॉटेल, लॉज आणि डॉर्मिटरींतून अधिक कडक पडताळणी झाली पाहिजे. हे जोवर होत नाही, तोवर कोणीही यावे आणि लुटून जावे हा सिलसिला सुरूच राहील. राज्यांच्या सीमांवरील नाके आज अक्षरशः कुचकामी ठरले आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त नावापुरती उरली आहे. कोकण रेल्वेचा सर्वांत जास्त फायदा हा गुन्हेगारांना होत असतो. गुन्हेगारी रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न जोवर होत नाहीत, तोवर अशा घटना घडतच राहतील. पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांना न्यायदेवता कठोरातील कठोर सजा देईल हे आता पाहिले जावे!