Home Featured ‘कॉर्पोरेट जिहाद’

‘कॉर्पोरेट जिहाद’

0

टीसीएससारख्या जागतिक कीर्तीच्या भारतीय आय. टी. कंपनीच्या नाशिक शाखेमध्ये धर्मांतर आणि त्याच्याशी निगडीत लैंगिक शोषणाचा जो प्रकार उघडकीस आला आहे तो अतिशय धक्कादायक आहे. अठरा ते पंचवीस वयोगटातील हिंदू महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य बनवून त्यांना मुसलमान बनवण्यास प्रवृत्त करणे, त्यासाठी त्यांना सातत्याने व पद्धतशीरपणे लक्ष्य करणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि ह्या दुष्कृत्याला साथ न देणाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकून त्यांचा मानसिक छळ करणे असे हे सगळे कारस्थान होते हे पोलीस तपासात उघड झाले आहे. एक हिंदू तरुणी हिंदू असूनही मुसलमानांसारखी रमझानचे रोजे पाळते हे पाहून संशय आल्याने एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार नोंदवली आणि पोलिसांनीही तत्परतेने ह्या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी हाऊसकीपिंग स्टाफ असल्याच्या बहाण्याने पोलिसांनाच कंपनीत पाठवून तेथे चाललेल्या सगळ्या कारभाराचा पर्दाफाश केला. तेथे काम करणाऱ्या हिंदू तरुणींवर अश्लील शेरेबाजी करणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात गुरफटवून आणि त्यांना बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण करणे, मुसलमानांसारखा पेहराव करण्यास प्रवृत्त करणे, धर्मांतरास उद्युक्त करणे आणि त्यासाठी मलेशियातील एका धर्मगुरूशी ऑनलाइन संपर्क साधून देणे असा सगळा अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने प्रकार सुरू होता. त्यासाठी ह्या प्रकरणात गुंतलेले विशिष्ट धर्मीय कर्मचारी एक स्वतंत्र व्हॉटस्‌‍ॲप ग्रुप चालवत होते व त्यावरून एकमेकांना निर्देश दिले जात असत. ज्या तरुणी ह्या षड्यंत्राला जुमानत नव्हत्या, त्यांना सेवेतून कमी करण्याच्या धमक्या देणे अथवा त्यांना नोकरी सोडून जाण्याइतपत परिस्थिती निर्माण करणे, त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा प्रचंड बोजा टाकून त्यांचा मानसिक छळ करणे असा सगळा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू होता. आता ह्या प्रकरणाच्या तपासात पुढे आले आहे की किमान सन 2022 पासून म्हणजे गेली चार वर्षे हे प्रकार सुरू होते. ह्यासंदर्भात काही तरुणींनी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाच्या महिला अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रारीही केल्या, परंतु तिने त्याकडे पूर्ण डोळेझाक केली. त्यासाठी तिलाही ह्या जाळ्यात ओढण्यात आले असावे आणि आर्थिक लाभ दिला जात असावा असा संशय आहे व त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि टीसीएससारख्या नामांकित कंपनीमध्ये हे घडले हे त्याहून धक्कादायक आहे. मात्र, एवढा गंभीर प्रकार होऊनही सदर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने ह्या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली दिसत नाही. खरे म्हणजे केवळ नाशिक शाखेपुरती ही कारवाई सीमित असता कामा नये. ह्यासंदर्भात कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापनही तितकेच जबाबदार आहे, कारण आपल्या कंपनीत काय चालले आहे ह्याकडे त्यांचे लक्षच नव्हते असेच ह्यातून दिसून येते. केवळ सदर कंपनीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय कॉर्पोरेट जगतासाठी हा धोक्याचा इशारा आहे. असेच प्रकार अन्य आय. टी.व इतर क्षेत्रांतील कंपन्यांतही चाललेले असू शकतात. आजवर ‘लव्ह जिहाद’ची जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा तो कल्पोकल्पित राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे बुद्धिवाद्यांचा कल असायचा. परंतु आता हे जे प्रत्यक्ष पुरावे समोर येत आहेत, त्यामुळे ह्यासंबंधीच्या तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले आहे. टीसीएसमधील प्रकरण हा सरळसरळ ‘कॉर्पोरेट जिहाद’चा प्रकार आहे हे स्पष्ट दिसते. आणखी कोणत्या कंपन्यांमध्ये असे प्रकार चालले होते किंवा आहेत का आणि त्यासाठी विदेशातून पैसा वगैरे पुरवला जातो का ह्या अंगानेही हा तपास व्यापक स्वरूपात झाला पाहिजे. कॉर्पोरेट जगताना आपापल्या कंपन्यांमधून अशा प्रकारांना संधी तर मिळत नसेल ना हे तपासणे आणि अशा गोष्टी घडू नयेत आणि घडत असतील, तर त्याविरुद्ध तक्रार करण्याची रीतसर पद्धत घालून देणे अत्यंत जरूरी आहे. सरकारनेही त्यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले पाहिजेत. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनावर देखील फौजदारी कारवाई झाली पाहिजे. वरिष्ठ व्यवस्थापनाने घडलेल्या ह्या घृणास्पद प्रकाराची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळासंदर्भात विशाखा समितीचे गठन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, परंतु कॉर्पोरेट जगतात त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. आता हा विषय केवळ लैंगिक छळापुरता नाही. धर्मांतरणाच्या प्रयत्नांपर्यंत त्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाच्या मुळाशी तर सरकारने जावेच, परंतु असे प्रकार अन्यत्र घडू नयेत यासाठी कडक उपाययोजनाही तातडीने कराव्यात. नुसते ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ पुरेसे नाही. जीवनात तिला सन्मानाने जगता यावे ह्यासाठी देखील सरकारने उपाययोजना कराव्यात.