Home बातम्या गुदिन्हो यांचे ‘ते’ विधान बेजबाबदारपणाचे : नाईक

गुदिन्हो यांचे ‘ते’ विधान बेजबाबदारपणाचे : नाईक

0

मांद्रे मतदारसंघातील मगोचे आमदार जीत आरोलकर यांनी गोवा विधानसभेची पुढील निवडणूक ही भाजप उमेदवारीवर लढवावी, असे जे वादग्रस्त विधान भाजप नेते तथा मंत्री माविन गुदिन्हो यांनी हल्लीच मांद्रे येथील एका कार्यक्रमात केले होते, त्याविषयी प्रतिक्रिया देताना काल भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी माविन गुदिन्हो यांना खडेबोल सुनावले. गुदिन्हो यांनी केलेले सदर विधान हे बेजबाबदारपणाचे असल्याचे दामू नाईक म्हणाले. भाजपच्या आमदारांनी अशा प्रकारे माध्यमांसमोर वैयक्तिक मते मांडणे टाळावे. तसेच पक्षाची भूमिका लक्षात घेऊन योग्य असेच मत मांडावे. सर्व आमदारांनी शिस्तीचे पालन करावे, अशी सूचनाही दामू नाईक यांनी केली. एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या आमदाराने भाजपच्या उमेदवारीवरून निवडणूक लढवावी, अशी जाहीरपणे मागणी करण्याचा अधिकार भाजपने आमच्या कोणत्याही नेत्याला दिला नसल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले. कोणत्याही दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला पक्षप्रवेश देण्यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत कोणत्याही नेत्याने स्वत:हून वरील प्रकारची विधाने करू नयेत, अशी सूचना नाईक यांनी केली.