पिता-पुत्राच्या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणी मदुराई जिल्हा न्यायालयाचा निकाल
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या तामिळनाडूतील साथानकुलम ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणात काल मदुराईच्या जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. पोलीस कोठडीत पिता-पुत्राचा अमानुष छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या 9 पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. वर्दीतील रक्षकांनीच भक्षकाची भूमिका बजावल्याने न्यायालयाने हे ‘दुर्मिळात दुर्मिळ’ प्रकरण असल्याचे ताशेरे ओढले आहेत.
2020 मध्ये कोरोना लॉकडाऊन दरम्यान, थोथुकुडी जिल्ह्यातील साथानकुलम येथे पी. जयराज (58) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (31) यांनी आपले मोबाईलचे दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ उघडे ठेवले होते. या क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कोठडीत या पिता-पुत्रावर रात्रभर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. त्यांच्या गुप्तांगांना इजा पोहचवण्यात आली आणि रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांना छळण्यात आले. अखेर 22 आणि 23 जून 2020 रोजी या दोघांचा मृत्यू झाला होता.
मदुराई जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले की, ज्या पोलिसांवर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती, त्यांनीच निष्पाप नागरिकांची अमानुष छळ करत हत्या केली. तपासादरम्यान सीबीआयने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये पोलीस स्थानकाच्या भिंतींवर पीडितांच्या रक्ताचे डाग आढळले होते. यावरून पोलिसांच्या निर्दयीपणाचा पुरावा मिळाला.
दोषी ठरलेल्या 9 पोलिसांमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक बालकृष्णन आणि रघु गणेश यांच्यासह अन्य 6 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यातील एका आरोपीचा कोरोनामुळे आधीच मृत्यू झाला होता. फाशीच्या शिक्षेसोबतच, पीडित कुटुंबाला 1.40 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दोषींना देण्यात आले आहेत. हा निकाल पोलीस प्रशासनातील गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावणारा ठरेल, अशी भावना पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे.