सरकारने दिली उच्च न्यायालयात ग्वाही
शिरगाव-डिचोली येथील श्री लईराई देवीच्या आगामी जत्रोत्सवात भाविक व भक्तांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून सरकारी यंत्रणेने जत्रोत्सवात पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी पाऊल उचलले आहे, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल दिली.
शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवात गतवर्षी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यात काही जणांचा बळी गेला होता. तर, अनेकजण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात एक याचिका दाखल करून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. गोवा खंडपीठात या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. सरकारी यंत्रणेने आगामी जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. चेंगराचेंगरीनंतर सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने केलेल्या सर्व शिफारशी आणि उपाय योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
गोवा खंडपीठाने राज्य सरकारच्या आश्वासनानंतर सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित याचिका निकाली काढली आहे. गोवा सरकारने याचिकादाराने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण केले असून सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती न्यायालयात दिली. यावर्षी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी कडक देखरेख, वाहतूक नियमन, रस्त्यालगतच्या दुकानांवर निर्बंध आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करणे यासह व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सरकारने लईराई जत्रोत्सवातील सुरक्षेसाठी उचललेल्या पावलांवर न्यायालयाने समाधान व्यक्त केले असून त्यानुसार याचिका निकाली काढण्यात आली आहे, असे महाअधिवक्ता ॲड. देविदास पांगम यांनी सांगितले.