Home बातम्या होर्मुझप्रकरणी ब्रिटनमध्ये होणार आंतरराष्ट्रीय बैठक

होर्मुझप्रकरणी ब्रिटनमध्ये होणार आंतरराष्ट्रीय बैठक

0

भारतासह 35 देश सहभागी होण्याची शक्यता

सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यावर होणार चर्चा

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये लवकरच एक मोठी आंतरराष्ट्रीय बैठक होणार आहे, ज्यात अंदाजे 35 देश सहभागी होतील. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यावर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री करतील. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील 20% तेलाची वाहतूक होते. मात्र सध्या इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जहाजे या मार्गावरून जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या वर गेल्या आहेत.

दबावाला बळी पडणार नाही ः इराण
इराणने स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सन होर्मुझची सामुद्रधुनी त्यांच्या नियंत्रणाखाली आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक वक्तव्यांमुळे ती उघडली जाणार नाही असे ठामपणे सांगून त्यांच्या अटी पूर्ण झाल्यासच हा मार्ग उघडला जाईल असे म्हटले आहे.

इराणवर विजय मिळवला ः ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, इराणसोबतच्या संघर्षामध्ये अमेरिका विजयी ठरली असल्याचा दावा केला. अमेरिका येत्या दोन ते तीन आठवड्यांत इराणवर मोठा हल्ला करेल, असाही इशाराही यावेळी बोलताना त्यांनी दिला. इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन क्षमता, तसेच त्यांची नौदल शक्ती निष्प्रभ करण्यात आली असल्याचे ट्रम्प यांनी पुढे नमूद केले. इराणची लष्करी ताकद बऱ्याच प्रमाणात कमकुवत झाली असून या लष्करी मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट साध्य होण्याच्या अगदी उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला आहे. करार न झाल्यास इराणला पाषाण युगात ढकलू असाही इशारा यावेळी ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इराणची क्षेपणास्त्र-ड्रोन क्षमता आणि नौदल नष्ट झाले आहे, पण आपले सैन्य त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांचे सर्व प्रमुख नेते मारले गेले असून सत्तांतर झाले आहे. इराणने आपल्याच 45,000 लोकांना ठार मारले. इराणला अणुशक्ती बनू दिले जाणार नाही. जर करार झाला नाही, तर त्यांना नष्ट केले जाईल. ज्यांना होर्मुझच्या तेलाची गरज आहे त्यांनी त्याचे रक्षण करावे, आम्हाला त्याची गरज नाही. सौदी अरेबिया आणि बहरीन यांना एकटे सोडले जाणार नाही असे ट्रम्प यांनी सांगितले.

भारताला निमंत्रण

‘होर्मुझची सामुद्रधुनी’ खुली करण्यासाठी ब्रिटन पुढाकार घेत आहे. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी या उपक्रमात भारताला भागीदार म्हणून समावेश केले असून, भारताला चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या चर्चेत 35 प्रमुख देश सहभागी होत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री भारताच्या वतीने आभासी पद्धतीने सहभागी होत आहेत. ब्रिटनची होर्मुझ शिखर परिषद ही पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या सरकारने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी सुरू केलेली एक बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय बैठक आहे. इराण युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच इराणच्या लष्कराने, आयआरजीसीने, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली किंवा त्यावर नियंत्रण मिळवले. याचा परिणाम भारत, चीन, जपान, मलेशिया आणि इंडोनेशियासह अनेक देशांच्या पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर झाला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीच्या संकटाबाबत त्यांनी तिच्या सुरक्षेची जबाबदारी इतर देशांनी घ्यावी असे आवाहन केले होते. मात्र एक दिवसापूर्वीच त्यांनी, होर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्याशिवाय कोणताही करार होणार नाही असेही म्हटले होते.