Home बातम्या भारताकडे 60 दिवसांचा तेलसाठा

भारताकडे 60 दिवसांचा तेलसाठा

0

आखातात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताकडे पुढील 60 दिवसांचा तेलसाठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट केले आहे. काल गुरुवारी विविध मंत्रालयांनी याबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंधन पुरवठा आणि निर्यातीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

यापूर्वी भारताकडे 25 दिवस पुरेल इतकाच तेलसाठा असल्याचे भारताचे जाहीर केले होते. होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्यानंतर भारताने इतर 42 देशांकडून कच्चे तेल मागवले होते. त्याच दरम्यान, इराणकडूनही भारताला कच्चे तेल प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता भारताकडे सुमारे 60 दिवस म्हणजेच दोन महिने पुरेल इतका इधनसाठा जमा झालेला आहे.

आयात शुल्क हटवले
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून जहाजांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. याचा फटका बसू नये म्हणून सरकारने पेट्रोकेमिकल क्षेत्रातील अनेक उत्पादनांवरील आयात शुल्क पुढील 3 महिन्यांसाठी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योगांना कच्चा माल स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. या भागातून होणाऱ्या एकूण 56% निर्यातीवर युद्धाचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.