अमेरिकेने इराणविरोधातील कारवाया वाढवल्या असून इराणला नेस्तनाबूत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, इराणमधील इस्फाहान शहरातील एका मोठ्या दारुगोळा कोठारावर 2000 पाऊंडच्या पेनिट्रेटर (बंकर-बस्टर) बॉम्बने हल्ला करण्यात आला. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एकामागून एक अनेक स्फोट आणि आगीच्या ज्वाळा निर्माण झालेले दिसत आहे. मात्र, कोणताही संदर्भ नसलेल्या या व्हिडिओच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे की, इस्फाहानमधील लष्करी तळाला लक्ष्य करण्यासाठी सुमारे 907 किलो वजनाचे बंकर-बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. इस्फाहान हे इराणचे महत्त्वाचे संरक्षण केंद्र आहे.
दुसऱ्या बाजूला होर्मुज जलवाहतुकीचा मार्ग खुला केला जात नाही तोवर युद्धसमाप्त होणार नाही, असा पवित्रा घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता निर्णय बदलल्याचे संकेत मिळत आहेत. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरीही ते इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबवण्यास तयार आहेत.