मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आश्वासनानंतर 49 दिवसांपासून चाललेले आंदोलन संपले; आंदोलकांशी मडगावात चर्चा
स्थानिक लोकांना मिराबाग-सावर्डे येथे बंधारा नको असेल, तर आपण या प्रकल्पासंबंधीच्या फाईलवर तसा शेरा मारून सदर फाईल बंद करतो, असे आश्वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. यानंतर या बंधाऱ्याच्या प्रश्नावरून गेले 49 दिवस आंदोलन करणाऱ्या मिराबागवासियांनी काल आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, काल मुख्यमंत्री हे काल मडगावच्या दौऱ्यावर होते, तेथे आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली.
तत्पूर्वी, स्थानिक लोकांना जर हा प्रकल्प नको असेल, तर तो त्यांच्यावर लादण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. तसेच आपले तोंडी आश्वासन हे लेखी आश्वासनाइतकेच आपणासाठी बंधनकारक असेल, असे स्पष्ट करून लोकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी आवाहन केले होते.
मिराबागवासीयांनी गेल्या गुरुवारी मिराबाग-सावर्डे येथील नियोजित बंधरा प्रश्नी पुढील दोन दिवसांत सरकारने हा बंधारा रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले नाही, तर पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी हा बंधारा स्थानिकांना नको असेल, तर आपण या प्रकल्पासंबंधीच्या फाईलवर तसा शेरा मारून सदर फाईल बंद करतो, असे आश्वासन मिराबागवासियांना दिल्यानंतर काल त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या बंधाऱ्यामुळे मिराबाग गावाचे मोठे नुकसान होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त करीत गेल्या 49 दिवसांपासून या प्रकल्पाविरूद्ध आंदोलन सुरू केले होते. या बंधाऱ्यामुळे गावातील घरांना धोका निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती. सरकारने हल्लीच नदीतून जॅकवेलद्वारे पाणी खेचण्याचा प्रस्ताव स्थानिकांसमोर ठेवून बंधारा रद्द करण्याचे आश्वासन स्थानिकांबरोबर घेतलेल्या बैठकीतून दिले होते. मात्र, त्यावेळी स्थानिकांनी प्रथम बंधारा रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बंधारा रद्द करण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले.
जमावबंदी कलम लागू
दरम्यान, मिराबागच्या आंदोलनकर्त्यांना पणजीत प्रवेश करता येऊ नये यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यानी पणजी पोलीस स्थानक हद्दीत व विशेष करुन आझाद मैदान परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 खाली जमावबंदी लागू केली होती. आम्हाला पणजीत आंदोलन करता येऊ नये यासाठी पणजीत वरील कलम लागू केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. तसेच आझाद मैदानावर कडक पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.
या सगळ्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेवटी मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकत मिराबाग बंधारा रद्द करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही केले.
पणजीत जाण्यापासून अडवल्यानंतर रस्त्यातच ठिय्या
तद्पूर्वी काल सकाळी मिराबागच्या आंदोलनकर्त्यांनी ‘चलो पणजी, चलो आझाद मैदान’ अशा घोषणा देत पणजीला जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना गावातच अडवले. त्यामुळे संतप्त बनलेल्या लोकांनी रस्त्यावरच ठाण मांडून रस्ता अडवला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.