पेडणे पोलिसांकडून तिघांना अटक; कोठडीत रवानगी
भटवाडी-कोरगाव येथे पूर्ववैमनस्यातून मुकुंद नर्से व त्यांच्या चुलत भावावर तिघांनी चाकू आणि दंडुक्याने हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी तिघांना अटक केली.
पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) मध्यरात्री भटवाडी-कोरगाव येथे संशयित आरोपी ऋषिकेश संतोष नर्से (35), स्नेहल संतोष नर्से (29) आणि शुभम नवनाथ नर्से (30, सर्व रा. भटवाडी-कोरगाव) यांनी पूर्वीचे वैर मनात बाळगून मुकुंद नर्से यांना शिवीगाळ केली आणि नंतर चाकूने वार केले. तसेच, तक्रारदार आणि त्यांचा चुलत भाऊ सच्चिदानंद नर्से यांना लाकडी दांडा, प्लास्टिक पाईप, लाथा आणि ठोसे मारून जबर मारहाण केली.
यानंतर संशयितांनी दुचाकीचेही (क्र. जीए-11-एफ-1148) नुकसान केले. तसेच, तक्रारदाराला गंभीर परिणामांची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीनंतर पेडणे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 352, 324(4), 115(2), 118(2) आणि 351(2)(3) 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला. त्यानंतर मध्यरात्रीनंतर उशिरा त्या तिघांना अटक केली.
काल पोलिसांनी त्यांना न्यायालयात केले असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.