जुने गोवे पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव संमत
वारसा स्थळ असलेल्या जुने गोवे येथे मोठ्या संख्येने विकासकामे होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर काल जुने गोवे ग्रामपंचायतीने काल झालेल्या ग्रामसभेत पंचायत क्षेत्रातील वहन क्षमता तपासूनच सरकारने नव्या महाकाय प्रकल्पांना (मेगा प्रोजेक्टस) परवानगी द्यावी, असा ठराव ग्रामसभेत संमत केला. सरपंच मेधा पर्वतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या महाकाय प्रकल्पांच्या प्रश्नांवरून चिंता व्यक्त करण्यात आली.
जुने गोवे हे एक अत्यंत प्रसिद्ध असे वारसा स्थळ तसेच ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनासाठीचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक तसेच पर्यटकांची ये-जा होत असल्याने पायाभूत सुविधा, वाहतूक तसेच कचरा व्यवस्थापन आदींवर वाढता ताण पडत असतो. त्यामुळे या वारसा स्थळाजवळ मोठ्या प्रकल्पांना परवानगी दिल्यास जुने गोवे पंचायत क्षेत्रातील वहन क्षमतेवर प्रचंड ताण पडणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्याशिवाय वारसा स्थळाच्या सौंदर्यालाही बाधा येण्याची भीती ग्रामसभेतून व्यक्त करण्यात आली. यामुळे महाकाय प्रकल्पांना सरकारने यापुढे परवानगी देऊ नये, असा ठराव संमत करण्यात आला.