प्रकल्प, मॉल प्रश्नांवरून ग्रामस्थांचा प्रश्नांचा भडिमार
चिंबल ग्रामपंचायतीत काल रविवारी झालेल्या ग्रामसभेत चिंबल युनिटी मॉल उघड्यावर खासगी जागेत जमीन मालकाची परवानगी न घेता घेतलेली ग्रामसभा, पंचायत क्षेत्रातील विकासकामे आदी प्रश्नांवरून शाब्दिक चकमक उडाली. या ग्रामसभेच्या वेळी मोठा पोलीस फौजफाटा आणल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी यावेळी दोन ग्रामसभा प्रलंबित असल्याच्या प्रश्नावरून सरपंच संदेश शिरोडकर व पंचायत सचिवांना धारेवर धले. काल आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा ही कोणती हे स्पष्ट केले जावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा आणण्याचे कारण काय, असाही सवाल यावेळी एसटी नेते गोविंद शिरोडकर व अजय खोलकर यांनी केला. युनिटी मॉलसाठीच्या फाईलला सर्वप्रथम पंचायतीने विरोध केला होता असा दावा यावेळी सरपंच संदेश शिरोडकर यांनी केल्यामुळे सरपंच व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सरपंच खोटे बोलत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यावेळी ग्रामस्थांनी कचरा समिती स्थापन केली. जावी, भाडेकरू पडताळणी योग्य प्रकारे व्हावी, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी केली. बैठकीत ग्रामस्थांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे पंचायतीचे अंदाजपत्रक फेटाळण्याचा ठराव मांडला. अंदाजपत्रकाबाबत सल्लागाराकडून योग्य मार्गदर्शन घेण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी पंचायतीना केली.
ग्रामसभेसाठी खासगी जमिनीचा जमीन मालकाची परवानगी न घेता वापर करण्यात आल्याच्या प्रश्नही ग्रामसभेत गाजला. यावेळी जमीन मालकाने आपली परवानगी न घेता पंचायतीने आपल्या जमिनीत ग्रामसभा कशी घेतली असा प्रश्न उपस्थित केला.