माणिकराव ठाकरे; काँग्रेसने केली भूमिका स्पष्ट
गोवा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक असून ते काँग्रेस पक्षाचे अधिकृत मत नसल्याचा खुलासा काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.
विधानसभेच्या शेवटच्या दिवशी विरोधी आमदारांच्या खासगी ठरावांच्या मुद्द्यांवरून सर्व विरोधी आमदारांनी एकत्रितपणे आवाज उठवून सभात्याग केला होता. मात्र, विजय सरदेसाई यांनी त्यात सहभागी न होता सभागृहातच राहणे पसंत केले. त्यामुळे संतप्त झालेल्या युरी आलेमाव यांनी सरदेसाई यांच्यावर जोरदार टीका केली होती. सरदेसाई यांची ही कृती ‘फिक्सिंग’ असल्याचा आरोप आलेमाव यांनी नंतर विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना केला होता. त्यानंतर विजय सरदेसाई यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपली भूमिका पत्रकारांशी स्पष्ट केली होती.
या प्रकरणी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, आलेमाव यांनी केलेल्या आरोपांशी काँग्रेस पक्षाचा कोणताही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. युरी आलेमाव यांनी एका विरोधी पक्षाच्या आमदाराविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे टाळायला हवे होते. गोवा फॉरवर्ड हा काँग्रेसचा सहकारी पक्ष असून, त्या नात्याने त्यांच्या नेत्यांविषयी सन्मानाने बोलले पाहिजे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. तसेच या प्रकरणी आपण स्वतः विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.