Home Featured श्रीनिवास धेंपो यांना ‘विद्याधिराज’ पुरस्कार प्रदान

श्रीनिवास धेंपो यांना ‘विद्याधिराज’ पुरस्कार प्रदान

0

अमरनाथ कामथ, श्रीनिवास भट व अनिल पै यांना जीवोत्तम; तर श्रीधर भट यांना पुरुषोत्तम पुरस्काराचे वितरण

पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवानंतरच्या 551 व्या वर्धापनदिन उत्सवात धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा पर्तगाळी मठाच्या केंद्रीय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांना काल ‘विद्याधिराज’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्तगाळी मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते ह्या पुरस्काराचे वितरण झाले. मानपत्र, पर्तगाळी येथील वटवृक्षाची प्रतिकृती व रोख 75 हजार रुपये असे विद्याधिराज पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच अमरनाथ कामथ, श्रीनिवास सावळा भट, अनिल वसंत पै यांना जीवोत्तम पुरस्कार, तर वेदमूर्ती श्रीधर गोविंद भट यांना पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवोत्तम पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, श्री हनुमानाची प्रतिमा व रोख रुपये 50 हजार असे होते, तर पुरुषोत्तम पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, राम, सीता व हनुमानाची प्रतिमा व रोख 50 हजार रुपये असे होते.

पर्तगाळी येथील नव्यानेच उभारलेल्या मध्वनारायण सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. पर्तगाळी मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामी महाराजांनी पारंपरिक समई प्रज्वलित केल्यानंतर आणि सुरुवातीला वेदघोष झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्याच्या व्यासपीठावर मठ समितीचे उपाध्यक्ष आर. आर. कामत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, उद्योजक अवधूत तिंबले आणि सौ. पल्लवी धेंपो यांची उपस्थिती होती. यावेळी दै. ‘नवप्रभा’ने पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने काढलेल्या विशेष पुरवणीचे स्वामीजींच्या हस्ते प्रकाशन झाले. दरम्यान, सर्व पुरस्कार विजेत्यांच्या मानपत्राचे वाचन अनिल पै आणि शिरीष पै यांनी केले.

फळाची आशा न धरता काम
करत राहा : विद्याधिशतीर्थ स्वामी

यावेळी प. पू. श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामी महाराजांचे आशीर्वचनपर भाषण झाले. धेंपो घराण्याचे पर्तगाळी मठाशी फार जुने संबध असून, या घराण्याचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन श्रीनिवास धेंपो यांना विद्याधिराज पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना जीवोत्तम आणि पुरुषोत्तम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचेही समाजासाठी फार मोठे योगदान आहे. अन्य व्यक्तींना त्यांच्या कार्यातून प्रोत्साहन मिळावे या हेतूने हे पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र कोणीही पुरस्काराची आशा धरून काम करू नये. कर्मानेच माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होत असते. म्हणून फळाची आशा न धरता कर्म करीत राहा, असा सल्ला श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामी महाराजांनी दिला.
यावेळी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी मठ वास्तू आणि विद्यमान स्वामीजींच्या कार्याचा गौरव करताना पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कु. किरण नायक यांच्या पर्तगाळी मठावर आधारित तयार केलेल्या चित्रफितीचे स्वामींनी अनावरण केले.

यंदाचा चातुर्मास पर्तगाळी मठात
श्रीमद्‌‍ विद्याधिशतीर्थ स्वामी महाराज हे यंदाचा चातुर्मास पर्तगाळी मठात साजरा करणार असून, त्याची घोषणा यावेळी स्वामी महाराजांनी केली. यंदाचा चातुर्मास 6 ऑगस्टला सुरू होणार असून, त्याची समाप्ती 26 सप्टेंबरला होणार आहे. तसेच यंदाचा रामनवमी उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

मठात संस्कृत विद्यापीठ स्थापनेचा संकल्प
पर्तगाळ मठात संस्कृत विद्यापीठ आणि संशोधन केंद्र स्थापनेचा संकल्प केला असून, येत्या जून महिन्यापासून संस्कृत विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी प्रास्ताविकात दिली.

श्रीनिवास धेंपो काय म्हणाले?
– गुरू आणि कुलदैवते ही आमच्या रक्षणाची कवचकुंडले आहेत. हे कवच असले तर चिंताविरहित जीवन जगणे सुलभ होत असते.

  • – या मठाने साजरा केलेला सार्ध पंचशताब्दी महोत्सव ‘न भूतो…’ असा होता, त्याचे श्रेय विद्यमान स्वामींजीनाच द्यायला हवे.
  • – मागच्या चार वर्षांत स्वामीजींनी जे निर्णय घेतले, त्यातून त्यांची दूरदृष्टी वारंवार दिसत आहे. विद्यमान स्वामीजी ज्ञानवंत, बुद्धिवंत आणि 100 वर्षांचे नियोजन बाळगणारे असामान्य व्यक्तिमत्व आहेत.
    – सारस्वत समाजाबरोबराच इतर समाजाविषयी स्वामीजींना कळवळा आहे.
    ख् आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला विद्याधिराज पुरस्कार देऊन त्यांनी मोठा मान-सन्मान दिला आहे, अशा शब्दांत श्रीनिवास धेंपो यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले.