युद्ध संपुष्टात आणायचे असेल तर आमच्या तीन मागण्या मान्य करा असा प्रस्ताव इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी जगापुढे ठेवला आहे. आपल्या देशाच्या वैध अधिकारांना मान्य केले जावे, युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी आणि भविष्यात आपल्यावर पुन्हा हल्ले चढवले जाणार नाहीत ह्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने हमी घ्यावी अशा ह्या तीन मागण्या आहेत. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हे युद्ध हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला असल्याने ते मात्र अजूनही ‘संपूर्ण विजया’ची भाषा बोलताना दिसत आहेत. खरे तर हे युद्ध ट्रम्प यांनीच जगावर लादले आहे. इराणपासून अण्वस्त्रांचा धोका असल्याचा बागुलबुवा अमेरिकेने गेल्या अनेक वर्षांपासून उभा केला होता. गेल्या वर्षी इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढवले त्यानंतर तरी त्याबाबतच्या शंका दूर व्हायला हरकत नव्हत्या, परंतु ट्रम्प यांनी इराणमध्ये तीन दिवसांत सत्तापालट घडवण्याच्या गमजा मारत इस्रायलच्या मदतीने युद्ध पुकारले, परंतु आता ते त्यांच्या आटोक्याबाहेर गेले आहे आणि इराणबरोबरच अमेरिकाच नव्हे, तर अवघ्या जगासाठी संकट बनू लागले आहे. काही काळापूर्वी इराणमध्ये तेथील राजवटीविरुद्ध युवकांची निदर्शने समाजमाध्यमांकरवी घडवून आणली गेली होती. ती बळाचा वापर करून खामेनेई राजवटीने मोडून काढली. त्यामुळे एकदा का ही खामेनेई राजवट संपुष्टात आणली की युवा पिढी इराणची सत्ता ताब्यात घेईल अशा दिवास्वप्नात ट्रम्प होते. परंतु खरे तर युद्धाच्या पहिल्याच दिवशी खामेनेई यांचा खात्मा झाला, त्यानंतर इराणचे सर्व प्रमुख मंत्री, नेते, सैनिकी नेते देखील हल्ल्यांत मारले गेले, तरीही इराण निर्नायकी अवस्थेला पोहोचला नाही. खामेनेईंचा मुलगा मुज्तबा हा हल्ल्यात जखमी स्थितीत असूनही त्याच्या नेतृत्वाखाली इराण लढतोच आहे. अमेरिका आणि इस्रायलने त्यांचे नौदल बुडवले, जवळजवळ साडे पाच हजार ठिकाणांना लक्ष्य करून सैन्यदलांपासून पोलिसांपर्यंत सर्वांना संपवण्याचा प्रयत्न केला, हवाई तळ उद्ध्वस्त केले, परंतु तरीही इराण लढतो आहे. क्षेपणास्त्रे आणि स्वस्तातली कामिकाझे द्रोन यांच्या मदतीने इराणने सर्व शक्तीनिशी कडवा प्रतिकार चालवला आहे. ट्रम्प यांची नेतृत्वबदलाची अटकळ तर चुकलीच, परंतु इराणनने केवळ इस्रायलला लक्ष्य करण्याऐवजी संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, ओमान आणि कतार ह्या सहा आखाती देशांनाही थेट लक्ष्य करीत युद्धाचे कार्यक्षेत्रच विस्तारून ट्रम्प यांची गणिते उलटीपालटी करून टाकली आहेत. ट्रम्प यांना हे बिल्कूल अपेक्षित नव्हते. इराणबरोबरच लेबनानमधील हिजबुल्ला, इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्स, येमेनमधील हौथी वगैरेंचे जे ‘ॲक्सीस ऑफ रेझिस्टन्स’ इराणने आजवर विकसित केले आहे, त्यांनीही इराणच्या वतीने प्रतिकार चालवला. त्यामुळे इस्रायलला त्या आघाडीवरही लढणे भाग पडले. इराणने द्रोनहल्ले चढवून अमेरिकेच्या तळांना आणि आखाती देशांनाही जेरीस आणले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा इराणसाठी हुकमाचा एक्का होता. इराणवर युद्ध लादताना अमेरिकेने तो धोका विचारात घेतला नव्हता. होर्मुझमधील तेलवाहतूक इराणला रोखता येणार नाही अशा भ्रमात ट्रम्प होते, परंतु प्रत्यक्षात जे घडले ते वेगळेच. या सामुद्रधुनीतून जगातील एकूण तेलनिर्यातीपैकी वीस टक्के वाहतूक होत असते. तेथून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले चढवून इराणने जागतिक अर्थव्यवस्थेलाच मोठा हादरा दिला आहे. युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती वीस टक्क्यांनी वाढल्या. आता जगभरात इंधन आणि गॅस टंचाई भासू लागली आहे. हे युद्ध लांबले तर परिस्थिती बिकट होत जाणार आहे. खुद्द अमेरिकेला ह्याचे जबर चटके बसायला सुरूवात झाली आहे. ट्रम्प यांना अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांना सामोरे जायचे आहे. युद्धातील विजयाची शेखी मिरवण्याची त्यांची संधी तर हुकलीच आहे, उलट जगाला अस्थिरतेच्या आणि महागाईच्या खाईत ढकण्यास ते कारणीभूत ठरले आहेत. ह्या युद्धातून माघार घेणेही अमेरिकेसाठी आता अप्रतिष्ठेचे बनले आहे. त्यामुळे इराणने सध्या पुढे केलेल्या तीन शर्तींचा काडीचा आधार घेऊन अमेरिकेने माघार घेणे जगाच्या हिताचे ठरेल. परंतु ट्रम्प यांना ही सुबुद्धी येणार की त्यांचा अहंकार प्रबळ ठरणार हे पाहावे लागेल. आमच्याकडे युद्ध दीर्घकाळ लांबवण्यासाठी अमर्याद शस्त्रास्त्रे आहेत अशा गमजा करणाऱ्या ट्रम्प यांना व्हिएतनामपासून अफगाणिस्तानपर्यंतच्या युद्धांमध्ये अमेरिकेचे शेवटी काय झाले ह्या इतिहासाचे विस्मरण झालेले दिसते. त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर तात्काळ शांतीची प्रस्थापना ही या घडीची गरज आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रसंघासारखी संघटना आजच्याइतकी कमकुवत आणि लाचार कधीही नव्हत्या.