अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने इराणविरुद्ध छेडलेले युद्ध आता एक आटवडा संपून दुसऱ्या आठवड्यात प्रवेशले आहे. पहिल्याच दिवशी इराणचे नेते खामेनेई यांचा काटा इस्रायलने भीषण बॉम्बर्षाव करून काढला होता. त्यानंतर इराणची जनता देशाच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून उठेल आणि सत्ता आपल्या ताब्यात घेईल अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा होती. काही दिवसांपूर्वी झालेली युवकांची निदर्शने ज्या प्रकारे खामेनेई राजवटीने बळाचा वापर करून चिरडून टाकली होती, त्याच्या भरवशावर ट्रम्प यांनी ही अटकळ बांधली होती. परंतु इस्रायलने इराणवर हल्ला चढवला आणि सगळी समीकरणे बदलली. इराणचे सर्वोच्च नेतृत्व नष्ट करण्यात इस्रायल आणि अमेरिकेला यश आले असले, तरी इराणचा लढण्याचा निर्धार मोडून काढता आलेला नाही. ज्या प्रकारे इराणने ठोशास ठोसा न्यायाने उत्तर देणे सुरू ठेवले आहे, ते पाहिले तर हे युद्ध लांबणार तर नाही ना आणि हळूहळू तिसऱ्या महायुद्धाकडे तर जग चाललेले नाही ना अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. इराण केवळ इस्रायलला प्रत्युत्तर देऊन थांबला नाही. त्याने अमेरिकेचे आखातातील तळ लक्ष्य केले, इतकेच नव्हे, तर अमेरिकेला मदत करणाऱ्या आखातातील सर्व देशांवर हल्ले चढवून इशारा दिला. दुबईपासून दोहापर्यंत ज्या प्रकारे इराणनने क्षेपणास्त्रे डागली, त्यातून तेथील राजवटींना स्पष्ट संदेश दिला गेला. अमेरिकेने हिंदी महासागरात इराणची भारतातून परत चाललेली युद्धनौका पाणबुडीद्वारे हल्ला करून बुडवली, त्याचा सूड काल इराणनने बहरीनमधील अमेरिकेच्या फिफ्थ फ्लीटवर हल्ला चढवून उगवला आहे. अमेरिकेसाठी आणि त्यातही व्यक्तिशः ट्रम्प यांच्यासाठी हा विषय प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे इराणला नमवण्यासाठी आत्यंतिक बळाचा वापर ह्यापुढील काळात होऊ शकतो. एव्हाना या संघर्षात हजारावर मृत्यू झाले आहेत. अमेरिका आणि इस्रायलचा मारा जसजसा वाढेल, तसतशी बळींची संख्याही वाढत जाईल. ह्यातून शेवटी साध्य काय होणार हा मोठा प्रश्न आहे. मुळात अमेरिकेने ज्या अण्वस्त्रांचा बाऊ करून इराणला लक्ष्य केले, ती अण्वस्त्रे कुठेच दिसलेली नाहीत. इराकमध्ये ज्या प्रमाणे सद्दाम हुसेनला रासायनिक अस्त्रे बनवीत असल्याचा आरोप करून पदच्युत करण्यात आले होते, तसाच प्रकार खामेनेई यांच्याबाबतीत झाला आहे. खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील इराण अमेरिकेवर हल्ला चढवण्याच्या विचारात आणि प्रयत्नात होता आणि हा अटळ धोका लक्षात घेऊन बचावाखातर आम्ही कारवाई केली असे ट्रम्प म्हणत असले आणि संयुक्त राष्ट्रसंघापुढे कलम 51 चा आधार घेत त्यांनी तीच मांडणी केली असली, तरी त्यांचा हा युक्तिवाद कोणी मानणार नाही. अमेरिकेत होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुका नजरेसमोर ठेवून ट्रम्प यांनी इराणवर कारवाई केली आहे. आपल्या देशातील आपली लोकप्रियता घसरत आहे हे लक्षात आल्याने त्यांनी ही कारवाई केली असली, तरी त्यातून निर्माण झालेल्या तेल संकटामुळे ही लोकप्रियता वाढण्याऐवजी घसरण्याचीच शक्यता अधिक आहे. हे युद्ध दोन तीन दिवसांत निकाली निघेल असे ट्रम्प यांना व्हेनेझुएलातील अनुभवावरून वाटले असावे, परंतु इराणचा प्रतिकार चिवट आहे. हे युद्ध फार दूरवर नेण्याची भाषा इराण बोलतो आहे. अर्थात, तेवढे सैनिकी सामर्थ्य इराणपाशी उरले आहे का हा वेगळा भाग, परंतु अमेरिकेच्या ताटाखालची राजवट तेथे निर्माण होणे कठीण दिसते. सीआयएने आता कुर्दीश बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवून चिथावले आहे. परंतु सध्याच्या युद्धातून इराणमध्ये जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, तिचा फायदा कट्टरपंथी शक्ती घेण्याचाच अधिक संभव दिसतो. जागतिक दहशतवादी चळवळीचा उदय ह्यातून होऊ शकतो. तसे झाले तर ते अवघ्या जगासाठी घातक ठरेल. आखातातील राजवटी आपापले सवतेसुभे सांभाळून आहेत. अमेरिकेशी मैत्रीचे संबंध ठेवून स्वतःच्या राजवटी टिकवण्यालाच ह्या मंडळींनी आजवर प्राधान्य दिले. मात्र इराणनने त्यांना देखील त्यांच्यापुढील धोक्याची जाणीव करून दिली आहे. हा संघर्ष चिघळणे त्यांच्याही हिताचे नाही हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. इस्रायल कोणाची पर्वा करीत नाही, परंतु इतर देशांचे तसे नाही. त्यांना विनाकारण ह्या संघर्षात पोळले जाण्यात यत्किंचितही स्वारस्य नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव अमेरिकेवर यावा ह्या दिशेने इराणने प्रयत्न चालवले आहेत. हा संघर्ष ते कुठवर नेऊ शकतात त्यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील. अमेरिकेला आता हे युद्ध निर्णायक स्थितीत नेण्यासाठी आपली घातक आयुधे बाहेर काढावी लागतील. परंतु ह्या सगळ्यातून ट्रम्प यांच्या हाती काय येणार ह्याबाबत अजूनही मोठे प्रश्नचिन्ह आहे. स्वतःला शांतिदूत म्हणवत जगभरची युद्धे थांबवल्याची शेखी मिरवणाऱ्या ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आणि इराणसंदर्भात केलेली कृती पाहता त्यांना शांततेचे नोबेल देण्याचा विचारही कोणी करणार नाही. आपल्या लहरी, युद्धखोर वर्तणुकीतून ट्रम्प यांनी अवघ्या जगाला संकटाच्या खाईत लोटले आहे हेच खरे.