सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर कोरले नाव; अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव; जसप्रीत बुमराह सामनावीर व संजू सॅमसन स्पर्धावीर
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांची स्फोटक फलंदाजी आणि अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विक्रमी 256 धावांचे लक्ष्य दिले होते; मात्र हे मोठे आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 159 धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले. तसेच भारत घरच्या मैदानावर टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला. जसप्रीत बुमराह सामनावीर व संजू सॅमसन स्पर्धावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय चुकल्याचे पहिल्या काही षटकांतच स्पष्ट झाले. भारतीय सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 43 चेंडूत 98 धावांची भागीदारी रचली. अभिषेक शर्मा 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी करून परतल्यावर ईशान किशनचा धमाका पाहायला मिळाला. संजूच्या साथीने त्याने दुसऱ्या गड्यासाठी 48 चेंडूत 105 धावांची भागीदारी रचली. 15 षटकांत भारतीय संघाने 200 धावांचा टप्पा पार केला. पहिल्या तीनही फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. 16 व्या षटकात जिमी नीशमने पहिल्यांदा संजू सॅमसनला बाद केले. त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकाराच्या मदतीने 89 धावांची खेळी साकारली. यानंतर याच षटकात नीशमने ईशान किशनला बाद केले, त्याने 25 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. अंतिम सामन्यात आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. याच षटकात फलंदाजीला आलेला कर्णधार सूर्यकुमार यादवही शून्यावर बाद झाला.
या पडझडीमुळे भारतीय संघ 250 धावांपर्यंत मजल मारणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते; पण अखेरच्या षटकात शिवम दुबेचा ‘पॉवर हिटिंग शो’ पाहायला मिळाला. त्याने 8 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 26 धावांचे योगदान देत भारताची धावसंख्या निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 255 पर्यंत नेली. या विश्वचषकात भारताने तिसऱ्यांदा 250 धावांचा टप्पा पार केला.
यानंतर दुसऱ्या डावात 256 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाजीला उतरले. पहिल्याच षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने फिन ॲलनचा सोपा झेल सोडला. मागील सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्यामुळे भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र तिसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने त्याला बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर फलंदाजीला आलेले रचिन रवींद्र (1), ग्लेन फिलिप्स (5) आणि मार्क चॅपमन (3) हे झटपट बाद झाले. त्यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी बाद केले. या दरम्यान सलामीवीर टीम सायफर्ट याने झटपट खेळी साकारत अर्धशतक ठोकले; मात्र तोही 26 चेंडूत 52 धावा करून वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
8 व्या षटकात 72 बाद 5 अशी न्यूझीलंडची अवस्था झाली. यानंतर आलेला डॅरेल मिचेल हाही फार मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार मिचेल सँटनर (43) याने प्रतिकार केला खरा; मात्र धावगतीचा दबाव वाढत असल्याने मोठे फटके मारण्याच्या नादात तोही बाद झाला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचे शेपूट गुंडाळत विजय साकार केला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 19 षटकांत 159 धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4, अक्षर पटेलने 3, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
2007, 2024 अन् 2026 मध्ये टीम इंडिया विश्वविजयी
भारताने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वावर आपला दबदबा सिद्ध केला. भारताने यापूर्वी 2007 साली कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा हा किताब पटकावला. आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकत इतिहासात लिहिला.
तीन वर्षांत भारताकडे तीन चषक
मागील तीन वर्षांत भारतीय संघाने तीन चषक पटकावले आहेत. या कालावधीत आयसीसीच्या तीन मोठ्या क्रिकेट स्पर्धा झाल्या असून, त्यात भारतीय संघाचाच दबदबा राहिला आहे. 2024 चा टी-20 विश्वचषक भारताने जिंकला. त्यानंतर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली आणि 2026 मध्ये पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
टीम इंडियाने जिंकले 5 विश्वचषक
या विजयासह भारताने क्रिकेटच्या इतिहासात आता एकूण पाच विश्वचषक विजयांची नोंद झाली. त्यामध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे दोन (1983 आणि 2011) आणि टी-20 विश्वचषकाचे तीन (2007, 2024, 2026) किताब समाविष्ट झाले आहेत.
विक्रमांचा पाऊस…
या विश्वचषकात भारतीय संघाने तिसऱ्यांदा 250 धावा टप्पा पार केला.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील 255 ही सर्वोच्च धावंसख्या उभारली.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाने सातव्यांदा 250 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला.
अभिषेक शर्माने 18 चेंडूतील अर्धशतकासह अंतिम सामन्यातील सर्वात जलद शतक झळकावले.
भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये 92 धावा केल्या. ही टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
भारतीय संघाने 44 चेंडूत धावफलकावर 100 धावा लावल्या. ही कोणत्याही संघाची अंतिम सामन्यातील जलद सांघिक शतक ठरले.
भारताने 24 चेंडूत सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रमही रचला.