Home बातम्या ‘कलम 39-ए’ ला सांकवाळ ग्रामसभेत

‘कलम 39-ए’ ला सांकवाळ ग्रामसभेत

0

मेगा प्रकल्पांनाही परवाने न देण्याची मागणी विरोध

नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त ‘कलम 39-ए’ रद्द करण्याची मागणी राज्यभर जोर धरत असतानाच काल रविवारी झालेल्या सांकवाळ पंचायतीच्या ग्रामसभेतही या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पंचायत क्षेत्रातील जमिनींचे रूपांतर या कलमांतर्गत करण्यास परवानगी देऊ नये आणि अशा कोणत्याही प्रस्तावाला पंचायतीने अधिकृतपणे विरोध करावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली. या विषयावरून ग्रामसभेतील वातावरण काही काळ चांगलेच तापले.

सांकवाळ पंचायतीचे विशेष ग्रामसभा एमईएस महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी झुआरी ॲग्रो कॅमिकल्स कंपनीची जमीन, प्रस्तावित मेगा प्रकल्प तसेच ‘कलम 39 ए’ या मुद्द्यांवरून ग्रामस्थांनी पंचायत प्रशासनाला धारेवर धरले. गावातील रस्त्यांचे जाळे अरुंद असून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधा अपुऱ्या असताना मोठ्या बांधकाम प्रकल्पांना किंवा मेगा प्रकल्पांना मान्यता देऊ नये, असा ठाम सूर ग्रामसभेत उमटला. कोणतेही नवीन प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी गावाची ‘कॅरिंग कॅपॅसिटी’ म्हणजेच विकास सहन करण्याची क्षमता तपासून त्याचा सविस्तर अभ्यास करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली. याशिवाय बंद पडलेल्या झुआरी ॲग्रो कॅमिकल्स व पॅरादीप फॉस्फेट या कंपन्यांकडून थकीत असलेल्या शुल्काची तातडीने वसुली करावी, असेही ग्रामस्थांनी सुचवले. पंचायतीच्या उत्पन्नाचे स्रोत मजबूत करण्यासाठी ही थकबाकी वसूल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘कलम 39 ए’मुळे गावाचे अस्तित्व आणि पर्यावरण धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत ग्रामसभेने या तरतुदीच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणात योग्य ती कडक पावले उचलण्याचे आश्वासन पंचायत मंडळाने दिले.