Home बातम्या पासपोर्ट कार्यालयातबॉम्बच्या अफवेने खळबळ

पासपोर्ट कार्यालयातबॉम्बच्या अफवेने खळबळ

0

पाटो-पणजी येथील पासपोर्ट कार्यालयात बॉम्ब ठेवण्याच्या संदेशाने काल सकाळी एकच खळबळ उडाली होती. तथापि, सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कसून तपासात पासपोर्ट कार्यालयात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने अखेर बॉम्ब ठेवण्याचा संदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. येथील अग्निशामक दलाला सकाळी 10.39 च्या सुमारास एका व्यक्तीने पासपोर्ट कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल व इतर सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी पाटो-पणजी येथे पासपोर्ट कार्यालयात धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. पासपोर्ट कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्याने कार्यालयातील सर्व विभागात बॉम्बचा शोध घेतला. तथापि, या तपासणीमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. येथील पासपोर्ट कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्याचा गुन्हा आणि सायबर विभागाकडून शोध घेतला जात आहे.