Home Featured पतीकडून पत्नीचा खून

पतीकडून पत्नीचा खून

0

साळगावातील घटनेने खळबळ; संशयिताला अटक

पतीने पत्नीचा खून केल्याची घटना काल साळगावात घडली. पत्नीकडून वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहातून पतीने तिची गळा चिरून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. पत्नीचा खून केल्यानंतर संशयित पती स्वत:हून पोलिसात हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
संशयित आरोपी विनोद भालचंद्र राठोड (40, मूळ रा. गदक, कर्नाटक) हा आपल्या कुटुंबासह साळगाव येथे वास्तव्यास आहे. पत्नी रुक्मिणी विनोद राठोड (वय 36) हिच्याशी त्याचे गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या कारणावरून खटके उडत होते. काल त्यांची तीनही मुले शाळेत गेले होती, त्यावेळी घरात कोणीही नसताना पती-पत्नीगध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात विनोदने सुरीने रुक्मिणीच्या गळ्यावर वार करून तिला जागीच संपवले.

हे क्रूर कृत्य केल्यानंतर संशयित विनोद राठोड हा पळून न जाता थेट साळगाव पोलीस स्थानकात पोहोचला. तिथे त्याने पोलिसांना घडल्या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक दिनेश गडेकर आणि हरिश्चंद्र मडकईकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
या घटनेमुळे साळगाव परिसरात खळबळ माजली असून, तीन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.