राज्यात कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही. मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच, नगरनियोजन खात्याच्या कार्यालयात आंदोलन करून कायदा हातात घेणाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिला.
पाटो पणजी येथील नगरनियोजन कार्यालयाने पाळे शिरदोन येथील नागरिकांच्या विरोधात तक्रार केली आहे. नागरिकांच्या आंदोलनामुळे कार्यालयातील काही फाईल्स गहाळ झाल्याची तक्रार आहे. तसेच, एका महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची तक्रार केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आमदार वीरेश बोरकर यांना कार्यालयातून बाहेर जाऊन आंदोलन करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु, आंदोलकांनी सूचनेचे पालन केले नाही. त्यामुळे आमदार वीरेश बोरकर यांना पोलिसांची मदत घेऊन कार्यालयातून बाहेर काढावे लागले. यात आमदार बोरकर यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
दोनापावल येथील मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन धमकी देणाऱ्या आंदोलकांवर आगामी काही दिवसांत कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.